The important role of higher education in the global Indian wave
जागतिक पातळीवरील भारतीय लाटेत उच्च शिक्षणाची महत्वाची भूमिका
– विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी
- ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ८१ व्या स्थानावरून ४१ व्या स्थानावर
- भारतातील ४९ टक्के स्टार्ट अप हे टायर २ आणि टायर ३ च्या शहरातून
- आपले मनुष्यबळ अधिक कौशल्यपूर्ण करण्याची संधी या शैक्षणिक धोरणाने दिली
- महिला सक्षमीकरण, ऑनलाईन शिक्षण, डिजिटल विद्यापीठ, उच्च शिक्षणातील विद्यार्थी संख्या वाढविणे आदी बाबींवर भर
पुणे : जागतिक पातळीवरील भारतीय लाटेत उच्च शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये यासाठी मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक धोरणात होत असणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मनीष जोशी यांच्याशी संवादाचे तसेच त्यांची माजी विद्यार्थी संघाच्या मानद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपल्या सादरीकरणादरम्यान ते बोलत होते.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य आणि माजी विद्यार्थी संघाचे संचालक राजेश पांडे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य राहुल पाखरे मुकुंद पांडे तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मनीष जोशी यांनी भारत जागतिक पातळीवर स्टार्टअप, संशोधन, इनोव्हेशनमध्ये कुठे आहे याची माहिती दिली. गेल्या काही वर्षात ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ८१ व्या स्थानावरून ४१ व्या स्थानावर आला आहे. भारतातील ४९ टक्के स्टार्ट अप हे टायर २ आणि टायर ३ च्या शहरातून आले आहेत. रिसर्च अँड डेव्हलमेंटवरचा खर्च हा तिप्पट झाला आहे असे अनेक दाखले त्यांनी यावेळी दिले.
जोशी पुढे म्हणाले, आफ्रिका या देशाचे मनुष्यबळ हे काही वर्षात भारतापेक्षाही अधिक असेल मात्र ते कौशल्यधारीत असेलच असे नाही. याउलट आपले मनुष्यबळ अधिक कौशल्यपूर्ण करण्याची या शैक्षणिक धोरणाने ही संधी दिली आहे. यासाठी उच्च शिक्षणात कौशल्य, पायाभूत सुविधा, नवीन तंत्रज्ञान, शाळांचे आधुनिकीकरण, जागतिक शिक्षणाची उपलब्धता आदी बाबी आपण करत आहोत. तसेच महिला सक्षमीकरण, ऑनलाईन शिक्षण, डिजिटल विद्यापीठ, उच्च शिक्षणातील विद्यार्थी संख्या वाढविणे आदी बाबींवर भर देण्यात येत आहे.
देशात १५ लाख उच्च शिक्षणातील शिक्षक आहेत तर चार कोटींहून अधिक विद्यार्थी आहे. या सगळ्यांसाठी आपल्याला काम करायचे आहे असेही जोशी यावेळी म्हणाले.
यावेळी उपस्थितांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याची अंमलबजावणी याविषयी शंकांचे निरसन जोशी यांनी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com