Honored with 9 National Tourism Awards, Maharashtra ranked second in the Best State Award
९ राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मान,सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कारामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्राला
पुणे : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आज जागतिक पर्यटन दिनी उपराष्ट्रपती श्री.जगदीप धनखड यांच्या हस्ते २०१८-१९ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्राला प्रथमच सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वंकष पर्यटन विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन विभागाच्यावतीने हा पुरस्कार स्विकारला आहे.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी तसेच पर्यटन सचिव अरविंद सिंह उपस्थित होते.
राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार हॉटेल, वाहतूक, गाईड, वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन, नागरी सुविधा अशा विविध श्रेणीत काम करणाऱ्या खाजगी व सार्वजनिक संस्थांना दिला जातो. महाराष्ट्रातील ९ संस्थांना हा पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारामध्ये पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन सर्वोत्कृष्ट राज्यात दुसरा क्रमांक, नागरी सुविधा (ब श्रेणी)- पाचगणी नगर परिषद (सातारा), ताजमहाल पॅलेस ५ तारांकीत डिलक्स, मुंबई, वेलनेस पर्यटन- आत्ममंथन वेलनेस रिसॉर्ट, मुळशी (पुणे), ग्रामीण पर्यटन, सगुणाबाग (नेरळ) चंदन भडसावळे, जबाबदार पर्यटन वेस्टर्न रुट्स्, पुणे, गीते ट्रॅव्हल्स- श्री. मनमोहन गोयल, वाहतूक (श्रेणी-१)- ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लि., होमस्टे दाला रुस्तर (पाचगणी) कॅप्टन विकास गोखले या संस्थांचा समावेश आहे.
सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर प्रतिक्रिया देताना म्हणाले, या पुरस्काराने आम्हाला आगामी काळात पर्यटन विकासाच्या कार्यास प्रेरणा व उर्जा मिळणार आहे.
वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे, वाहतूकीचे विकसित जाळे, निवासाच्या दर्जेदार सुविधा आणि अनुभवजन्य पर्यटनाच्या आधारावर आगामी काळात औद्योगिक क्षेत्रातील आघाडी प्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर राहील.
शाश्वत पर्यटन, सुरक्षित पर्यटन व अनुभवजन्य पर्यटन या त्रिसुत्रीवर आधारीत पर्यटन विकासाचे मॉडेल आगामी काळात महाराष्ट्रात उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com