Protect yourself from heat stroke
उष्माघातापासून असे करा स्वत:चे रक्षण
उष्माघात: कारणे, खबरदारी व मार्गदर्शक तत्वे
-
उष्माघात म्हणजे काय?
-
उष्माघात होण्याची कारणे
-
उष्माघाताची लक्षणे
-
उपचार
-
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय कराल
-
लहान मुलांना उष्णतेच्या लाटेसंबधित आजारापासून वाचविण्यासाठी जाणुन घ्या.
-
काय करु नये
काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनातर्फे महासाष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी लाखो नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला आलेल्या काही श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यातच ११ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघाताच्या बातम्या येत असतात. उन्हाळ्यात काळजी न घेतल्यास उष्माघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. तापमानाचा पारा वेगानं वाढत आहे. हे असंच सुरू राहिल्यास गंभीर परिस्थिती आणि समस्यांना तोंड द्यावं लागेल.
दरवर्षी आपल्याला त्याच परिस्थितीचा सामना करावा लागतो. पण यावर्षी ही परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण अत्यंत उष्णता आहे. राज्यात उच्च तापमान नोंदवलं गेलं आहे. बाहेर जाताना आपल्याला स्वतःची खूप काळजी घेणं आवश्यक आहे. काळजी घेण्यात हलगर्जीपणा केल्यानं जीवनशैलीवर दुरोगामी परिमाण होऊ शकतात.
वृद्ध, मधुमेह, मूत्रपिंड, अर्धांगवायू, हृदयरोग रुग्णांनी या दिवसात विशेष काळजी घ्यावी. तापमान वाढीमुळे शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला अगदी साधारण वाटणारी लक्षणं जर वेळेत आपण ओळखली नाही तर गंभीर स्वरूप धारण करू शकतात.
उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणयासाठी काय उपाय केले पाहिजे किंवा त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊया…..
उष्माघात म्हणजे काय?
उष्माघात म्हणजे नक्की काय तर उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे मानवी शरीराच्या तापमानात ४० अंश सेल्सिअसहून अधिक वाढ होऊ लागते. ज्यामुळे संबंधित व्यक्तीच्या महत्त्वाच्या अवयवांवर विपरित परिणाम होऊन त्यांच्या कार्यात बिघाड होतो. यालाच उष्माघात म्हटलं जातं. उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर उष्माघात होण्याचा धोका अधिक असतो. प्रचंड उष्णतेमुळे होणाऱ्या अशा उष्माघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक बनलं आहे.
उष्माघात होण्याची कारणे
उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे
जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे
घट्ट कपड्याचा वापर करणे
अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
उष्माघाताची लक्षणे
चक्कर येणे, त्वचा लालसर होणे, उलट्या, मळमळ होणे
सुस्त वाटणे , ह्रदयाचे ठोके वाढणे,
थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
भूक न लागणे, , निरुत्साही होणे, डोके दुखणे
रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी
उपचार
रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे
रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत
रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी
रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक्ड लावावेत
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय कराल
तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे
हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा
प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे
कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे
पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा
बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा
गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी
रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत
जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी
लहान मुलांना उष्णतेच्या लाटेसंबधित आजारापासून वाचविण्यासाठी जाणुन घ्या.
त्रास झालेल्या मुलाला लगेच सावलीत आणावे.
पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून आडवे पडण्यास सांगावे.
हवा येण्यासाठी पंखा चालू करावा.
व्यक्तीला वारंवार पाण्याचे घोट प्यायला द्यावे.
संवेदनशील राहून कपडे धीले करावे
उलटी होत असल्यास एका कूशीवर वळवावे, जेणेकरून त्यांना गुदमरणार नाही
मुलं बेशुद्ध असल्यास काही खायला किंवा प्यायला देण्याचा प्रयत्न करु नये.
उष्माघात रोखण्यासाठी मालक व कामगारांनी या गोष्टींचा अवलंब करायला हवा
अतिजोखमीची काम करणाऱ्या कामगारांनी, महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे
कामाच्या ठिकाणी मालकांनी कामगारांसाठी ठंड पाण्याची सोय केली पाहिजे.
कामगारांना कामाच्या ठिकाणी उनाहापासून वाचण्यासाठी शेडची सोय करावी.
कामगारांनी दर २० मिनिटांनी पाणी प्यावे.
दर एक तासांनी किमान ५ मिनिटांची विश्रांती घ्यावी.
बाहेरील आणि कठोर कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावी
मालकांनी अधिक मनुष्यबळाची सोय करावी किंवा कामाची गती कमी करावी
काय करु नये
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये
दुपारी १२.०० ते ३.३० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे
गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे
बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com