I will do my best to make Rollball a royal asylum: Sandeep Khardekar
रोलबॉल ला राजाश्रय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : संदीप खर्डेकर
राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा संपन्न
पुणे : रोलबॉल ह्या खेळाचा जनक पुण्यातील तरुण राजू दाभाडे आहे याचा तर सार्थ अभिमान आहेच पण जिद्दीने आणि कष्टाने या तरुणाने वा त्याच्या टीमने रोलबॉल ह्या खेळाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली असून आज 57 देशात हा खेळ खेळला जातो या यशाने ऊर भरून येतो असे गौरवोदगार संदीप खर्डेकर यांनी काढले. ह्या खेळाला पुण्यात, महाराष्ट्रात आणि देशातच नव्हे तर जगभर राजाश्रय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.पायाला स्केट्स बांधून मैदानात गोल करणे जिकिरीचे असून ह्या खेळाला लोकमान्यता मिळाली असून आता ह्या खेळाडूंच्या कौशल्याचे ही कौतुक होणे गरजेचे असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.
महाराष्ट्र रोल बॉल संघटना आणि पुणे जिल्हा रोल बॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन दिनांक 1 व 2 मे 2022 रोजी, पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी, पुणे इथे करण्यात आले होते त्याच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
लवकरच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाने यांस सहकार्य करावे अशी अपेक्षा रोलबॉल चे जनक राजू दाभाडे यांनी व्यक्त केली. तसेच ह्या खेळाच्या प्रचार वा प्रसारासाठी साठी शासनासह विविध उद्योजकांनी ही पुढाकार घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ चेतन भांडवलकर सचिव रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या हस्ते आणि आनंद यादव तांत्रिक समिती अध्यक्ष रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, धुळे, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, पुणे ई. जिल्ह्यातील मुले व मुलींच्या संघानानी सहभाग घेतला होता.
मुलांच्या गटांमध्ये तृतीय क्रमांका सामना जळगाव विरुद्ध अहमदनगर या दोन संघांमध्ये झाला हा सामना अहमदनगर संघाने ५-० असा एकतर्फी जिंकला अहमदनगर संघाकडून हर्षल घुगे तीन तर वेदांत घुगे, विराज बिंगी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविले.
अंतिम सामना पुणे आणि कोल्हापूर यांच्यामध्ये झाला. हा सामना पुणे संघाने ६–४ असा जिंकला पुणे संघाकडून अथर्व धायगुडे श्रेयश बोंबले यांनी प्रतेकी दोन तर मधुसूदन रत्नपारखी, आदित्य गणेशवाडे यांनी प्रत्येकी एक गोल केला, कोल्हापूर संघाकडून आदित्य सुतार दोन तर रोनक कणसे व आदित्य मगदूम यांनी प्रत्येकी एक गोल केले.
मुलींच्या गटामध्ये तृतीय क्रमांकाचा सामना ठाणे विरुद्ध अहमदनगर यांच्यात झाला हा सामना अहमदनगर संघाने २-१ असा जिंकला अहमदनगर संघाकडून संजना ठुबे हिने दोन गोल करून विजय मिळवून दिला, ठाणे संघाकडून आशा नागाला हिने एक गोल केला. अंतिम सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर या दोन संघांमध्ये झाला, अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये कोल्हापूरच्या अपूर्वा पाटील हिने एकमेव गोल करून कोल्हापूर संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्री संदीप खर्डेकर उपाध्यक्ष महाराष्ट्र रोल बॉल संघटना श्री गजानन थरकुडे अध्यक्ष पुणे जिल्हा रोल बॉल संघटना, नांदेड सिटीचे संचालक ॲड श्री नरसिंह लगड, ज्येष्ठ पत्रकार श्री प्रकाश गोरे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद काळे पुणे जिल्हा संघटना यांनी केले आभार प्रदर्शन एडवोकेट अमोल काजळे पाटील यांनी केले.
हडपसर न्यूज ब्युरो