Selection of IFFCO Tokyo Insurance Company for Vitthal Rakhumai Warkari Vima Chatra Scheme
विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेसाठी इफ्को टोकियो विमा कंपनीची निवड
योजना आषाढी वारी २०२३ करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी अथवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू
मुंबई : राज्य शासनाने वारकऱ्यांसाठी नुकतीच जाहीर केलेली ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ राबविण्याकरिता विमा हप्ता भरण्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीस विमा हप्त्यापोटी दोन कोटी ७० लाख रुपये अदा करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागाने जारी केला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता राज्यशासनाद्वारे “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” राबविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. संचालक, विमा प्रशासन, मुंबई यांनी ही योजना राबविण्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स को. लिमिटेड या विमा कंपनीची निवड केली आहे. या शासन निर्णयामध्ये या योजनेखाली १५ लाख वारकऱ्यांकरिता विमा हप्ता भरण्यासाठी २ कोटी ७० लाख रुपये इतकी रक्कम इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स को. लिमिटेड या कंपनीस अदा करण्याची व यानुषंगाने इतर काही सूचना निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार ही मान्यता देण्यात आली आहे.
ही योजना आषाढी वारी २०२३ करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी अथवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू राहील. या योजनेचा विमा कालावधी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३० दिवसाचा राहील. या योजनेंतर्गत विमा कंपनीकडे दावा करण्यासाठी संबंधितांनी विहित नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच संबंधित वारकरी आषाढी वारीकरिता श्री. क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे वारकरी राज्यातील ज्या गावाचा / शहराचा सर्वसाधारण रहिवासी आहे त्या गावाच्या / शहराच्या संबंधित तहसिलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. सर्व तहसिलदार संबंधित वारकरी आषाढी वारीकरिता गेल्याची खात्री करुन तशा स्वरुपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्याच्या वारसदारांना देणार आहेत.
हे ही अवश्य वाचा
वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू
या योजनेंतर्गत एखाद्या दुर्घटनेत, अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास या वारकऱ्याच्या वारसास एक लाख रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. तसेच दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व वा विकलांगता आल्यास विमा कंपनीकडून प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.
दोन्ही हात, दोन्ही पाय दोन्ही डोळे, एक हात पाय व एक डोळा निकामी झाल्यास १ लाख, एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५० हजार रुपये याव्यतिरिक्त वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी ३५ हजर रुपये किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच या योजनेंतर्गत एखाद्या दुर्घटनेत अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास १ लाख रुपये विमा या रकमेव्यतिरिक्त संबंधित वारकऱ्याच्या वारसास चार लाख रुपये इतकी रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येईल.
याकरिता संबंधित वारकरी यांच्या वारसाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्व जिल्हाधिकारी यांनी या योजनेंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करणारा अर्ज आल्यास, तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यूचे कारण, मृत्यूचा कालावधी व इतर आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करुन संबंधित वारकत्यांच्या वारसास ४ लाख सानुग्रह अनुदान मंजूर करुन वितरित करतील, असे या निर्णयात म्हटले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com