1 जुलै 2022 पासून बंदी घातलेल्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक वस्तूंची यादी जाहीर

Ban on disposable plastic items from 1 July 2022 एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तूंवर 1 जुलै 2022 पासून बंदी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

CPCB takes measures to implement the Single-Use Plastic Ban

1 जुलै 2022 पासून बंदी घातलेल्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक वस्तूंची यादी जाहीर

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी सीपीसीबीच्या उपाययोजना

नवी दिल्ली : देशभरात 30 जून 2022 पासून एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी घालण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी, सीपीसीबी म्हणजेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यापक उपाययोजना सुरु केल्या आहेत.

देशातून एकदाच वापरले जाणारे प्लॅस्टिक पूर्णपणे हद्दपार करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला अनुसरून ही मोहीम राबवली जात आहे. सीपीसीबीने यासाठी बहुआयामी उपाय सुरु केले आहेत. यात, असे प्लॅस्टिक तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात कपात, अशा प्लॅस्टिकची मागणी कमी व्हावी, यासाठी त्याला पर्यायी वस्तूंचा प्रसार-प्रचार, बंदीची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने व्हावी यासाठी डिजिटल साधनांचा वापर आणि जनजागृती तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन अशा बहुविध उपाययोजना केल्या जात आहेत.Hadapsar News Ban on single-use plastics

प्लॅस्टिक व्यवस्थापन नियम, 2016 नुसार, गुटखा, तंबाखू आणि पान मसाला विक्रीसाठी ठेवणाऱ्या छोट्या प्लॅस्टिक सॅशेवर (पुड्यावर) पूर्णपणे बंदी आहे.

ह्या कायद्यात, 2021 साली सुधारणा करण्यात आली असून, 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या पातळ प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन, आयात, साठा, वापर, विक्री आणि उपयोग अशा सगळ्यावर 30 सप्टेंबर 2021 पासून पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

याआधी, 2016 सालच्या कायद्यानुसार, ही बंदी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या पिशव्यांवर होती. त्याशिवाय, 12 ऑगस्ट 2021, रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार,  खालील एकल उपयोगाच्या प्लॅस्टिक  वस्तूंचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर यावर बंदी घालण्यात आली होती. यात, ज्यांचा वापर होण्याची क्षमता कमी आणि कचरा होण्याची शक्यता जास्त आहे, अशा वस्तूंचा समावेश असून, ही बंदी आता एक जुलै 2022 पासून लागू होणार आहे. ह्या वस्तू खालीलप्रमाणे:

i.  प्लॅस्टिक काड्या असलेले इयर बड्स, फुग्यासाठी प्लॅस्टिक काड्या, प्लॅस्टिक ध्वज, कॅन्डी स्टिक्स,  आईसक्रीम स्टिक्स, सजावटीसाठीचे पॉलीस्ट्रिन (थरमोकोल).

ii. प्लेट्स, कप्स, ग्लासेस, इतर वस्तू जसे काटेचमचे,  चाकू स्ट्रॉ, ट्रे, प्लॅस्टिक वेष्टन कागद, मिठाईवरील वेष्टन, आमंत्रण पत्रिका, सिगारेट पाकिटे, पीव्हीसी बॅनर वर लावलेले 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक, स्टरर्स यांवर बंदी.

ह्या सगळया वरील एकल वापराच्या वस्तूंचा पुरवठा बंद व्हावा, यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर निर्देश जारी करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, सर्व आघाडीच्या पेट्रोकेमिकल कंपन्या अशा बंदी घातलेल्या एसयुपी उत्पादनांसाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणार नाहीत.

त्याशिवाय, एसपीसीबी/पीसीबी (प्रदूषण नियंत्रण मंडळे) वायू/जल कायद्याअंतर्गत, अशी एसयुपी उत्पादने बनवणाऱ्या उद्योगांना दिलेली परवानगी मागे घेतील. अशा बंदी घातलेल्या वस्तूंची आयात पूर्णपणे थांबवण्याचे निर्देश सीमाशुल्क विभागाला देण्यात आले आहेत. हे सगळी शृंखला पूर्ण करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना या एसयुपी उत्पादनांची विक्री करायची नाही या अटीसह नव्याने व्यावसायिक विक्री परवाना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  जर व्यावसायिक ह्या वस्तूंची विक्री करतांना आढळले, तर त्यांचा परवाना रद्द होऊ शकेल.

सध्याच्या पुरवठ्याला पर्याय म्हणून, एसयुपी उत्पादनांना पर्यायी ठरतील, अशा वस्तूंना प्रोत्साहन देण्याचे कामही सुरु आहे.सीपीसीबीने यासंदर्भात याधीच, 200 उत्पादकांना जैवविघटन होऊ शकेल अशा प्लॅस्टिक निर्मितीसाठी वन-टाईम प्रमाणपत्र जारी केले आहे.

सरकारच्या उद्योगस्नेही धोरणानुसार, अशा प्रमाणपत्रांना वारंवार नूतनीकरण करण्याची आवश्यकता नसते. त्याशिवाय, ह्या उत्पादकांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन सुविधाही देण्यात आली आहे. एमएसएमई उद्योगांना पाठबळ देण्यासाठी, सीपीसीबी सीआयपीईटी च्या सहकार्याने, देशभर  एमएसएमईसाठी कार्यशाळा आयोजित केल्या असून, तिथे ह्या सगळ्या प्लॅस्टिक उत्पादनांना पर्याय देण्यासाठी आणि त्याचा  वापर करण्याची माहिती दिली जाणार आहे.

अशा तीन कार्यशाळा, रांची, गुवाहाटी आणि मदुराई येथे  आयोजित करण्यात आल्या होत्या. पेट्रो आधारित प्लॅस्टिक्स या पर्यायी प्लॅस्टिकचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील आयआयएससी आणि सीआयपीईटी यांच्यासारख्या तंत्रज्ञान संस्थांच्या आधारे प्रयत्न केले जात आहेत.

त्याचवेळी, अशा प्लॅस्टिक वस्तूंची मागणी कमी व्हावी, यासाठी ई-वाणिज्य कंपन्या, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचे उत्पादन/विक्री/वापर करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या, प्लॅस्टिकसाठीचा कच्चा माल बनवणाऱ्या कंपन्या या सगळ्यांना अशा वस्तूंचे उत्पादन टप्प्याटपपणे कमी करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांना या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, SPCB आणि स्थानिक संस्था सर्व नागरिकांच्या सहभागासह मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमेचे आयोजन करत आहेत – विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्वयं-सहाय्यता बचतगट, स्थानिक स्वयंसेवी संस्था, संघटना, बाजार संघटना, कॉर्पोरेट संस्था इ. जनजागृती मोहीम राबवली जात आहे. यापूर्वी, सीपीसीबीने देशभरातील गुटखा/पान मसाला उत्पादन उद्योगांची त्यांच्या उत्पादनाच्या पॅकेजिंगमध्ये प्लास्टिकचा वापर तपासण्यासाठी अचानक तपासणीही केली होती.

ह्या सगळ्या प्रयत्नांना एक सक्षम पाठबळ देणारी प्रणाली तयार करण्यासाठी सीपीसीबी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना बैठका आयोजित करून जारी केलेल्या सूचना कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. जेणेकरून संबंधित राज्यांतील सर्व शहरी स्थानिक संस्था त्यांच्या मदतीने मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतील. जून 2022 महिन्यात सर्व SPCBs/PCC चे अध्यक्षांसह केंद्रीय कार्यशाळेच्या व्यतिरिक्त SPCBs/PCCs सह प्रादेशिक कार्यशाळाही  आयोजित केल्या जात आहेत.

शेवटी, ही अंमलबजावणी प्रभावीपणे राबवली जावी ह्यावर देखरेख ठेवण्यासाठी  डिजिटल साधनांचा वापर केला जात आहे.  नागरिकांचा सहभाग सक्षम करण्यासाठी, केंद्रीय पर्यावरण आणि वन  मंत्री भूपेंद्र यादव यांनी एसयुपी सार्वजनिक तक्रार  अॅपचे उद्घाटन केले. अॅपमध्ये तक्रारींचा मागोवा घेण्यासाठी सुविधेसह जिओटॅगिंग वैशिष्ट्ये आहेत. अंमलबजावणीची प्रगती आणि दैनंदिन निरीक्षणासाठी CPCB द्वारे जारी केलेल्या सर्वसमावेशक निर्देशांचे पालन करून राज्य / केंद्रशासित प्रदेश प्राधिकरणांद्वारे अहवाल दाखल करण्यासाठी एक SUP अनुपालन देखरेख पोर्टल सुरु केले जाणार आहे.

भारताच्या हरित आणि पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठी SUP प्लास्टिकला टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रमुख भागधारकांच्या सक्रिय सहकार्याद्वारे अधिसूचित वस्तूंच्या एकल वापराच्या प्लास्टिक बंदी सुलभ करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ वचनबद्ध आहे.

cpcb.nic.in

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *