Effective implementation of Tobacco Control Act is essential – Ramnath Pokle
तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची – रामनाथ पोकळे
पुणे : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या अतिवापरामुळे मौखिक कर्करोगाचे प्रमाण युवकांमध्ये वाढत असून त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले.
पुणे जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या वतीने पुणे शहरातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासाठी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 यावर कार्यशाळेचे आयोजन पुणे पोलीस आयुक्तालय येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या राज्य प्रकल्प अधिकारी जिया शेख, विभागीय व्यवस्थापक अभिजित संघई आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुहासिनी घाणेकर यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व प्रकल्पाची माहिती दिली. जिया शेख व अभिजीत संगई यांनी कोटपा 2003 कायद्याची दृकश्राव्य माध्यमाद्वारे विस्तृत माहिती दिली.
सार्वजनिक आरोग्य दंतरोगतज्ञ डॉ. सहाना हेगडे यांनी तंबाखूमुक्त शाळा यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक स्वाती मोरे सुनंदा ढोले, गणेश उगले, दिपाली
भोसले, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी, समुपदेशक हनुमान हाडे यांनी परीश्रम घेतले. यावेळी तंबाखू विरोधी शपथेचे वाचन करण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com