Inauguration of 75 digital banking units across the country
देशभरात ७५ डिजिटल बँकिंग युनिट्सचं लोकार्पण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या ७५ डिजिटल बँकिंग युनिट्सचं लोकार्पण
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या ७५ डिजिटल बँकिंग युनिट्सचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. देशाच्या कानाकोपऱ्यात डिजिटल बँकिंग सुविधा आणि या सुविधेचे फायदे पोहोचावेत हा यामागचा उद्देश आहे.
बचत खाती सुरु कारण्यासाठी, खात्यातल्या बचतीची माहिती मिळवण्यासाठी, खातेपुस्तिकेच्या मुद्रणासाठी, रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी, मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, कर्ज मिळवण्याकरता अर्ज करण्यासाठी, धनादेश जारी करण्यासाठी, क्रेडीट आणि डेबीट कार्डकरता अर्ज करण्यासाठी, कर आणि देयके भरण्यासह अन्य अनेक बँकिंग संदर्भात कामांसाठी या युनिट्सचा उपयोग होणार आहे.
ही बँकिंग युनिट्स डिजिटल सेवांना सक्षम करतील तसंच देशाला बळकट डिजिटल बँकिंग पायाभूत सुविधा प्रदान करतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
यामुळे बँकिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात सुधारणा होण्यासह पारदर्शकता आणि विटीईटी समावेशनाला प्रोत्साहन मिळेल, असं ते म्हणाले. सामान्य लोकांच्या जीवन सुलभतेसाठी सुरु असलेल्या मोहिमेतलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. देशात तळागाळापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
किमान डिजिटल पायाभूत सुविधांसह जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नव्या भारतामध्ये बँकिंग सेवा सगळ्यांसाठी सहजतेने उपलब्ध होतील, असं त्यांनी सांगितलं. जनधन, आधार, मोबाईल सेवांनी सुविधा लवकर पोहोचवण्यातले अडथळे दूर केले आहेत.
योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होत असल्यामुळे आर्थिक वितरणात पारदर्शकता आल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा केला जाणारा वापर ही या सरकारची ओळख आहे, असं या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
पंतप्रधान म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था बँकिंग प्रणालीच्या मजबूततेवर अवलंबून असते. या मजबूततेमुळे न्यू इंडियाची अर्थव्यवस्था सुसंगत झाली आहे, असे ते म्हणाले. बँकिंग क्षेत्र हे सुशासन आणि उत्तम सेवा पुरवण्याचे माध्यम बनले आहे, असे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आज संपूर्ण जग थेट लाभ हस्तांतरण आणि भारताच्या डिजिटल पराक्रमाचे कौतुक करत आहे. पंतप्रधान म्हणाले की डिजिटल बँकिंग युनिट्स नवीन नवकल्पनांना चालना देतील. ते म्हणाले, न्यू इंडियाने डिजिटल चलनाकडे मोठ्या गतीने वाटचाल केली आहे आणि डिजिटल व्यवहारांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे.
या डिजिटल बँकिंग युनिटसमुळे आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन मिळेल, असं त्या म्हणाल्या. देशभरात ७५ जिल्ह्यांमध्ये विक्रमी सहा महिन्यांमध्ये ७५ डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितलं.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ७५ डिजिटल बँकिंग युनिटसची स्थापना करण्याची घोषणा, यंदाचा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. सार्वजनिक क्षेत्रातल्या ११ बँका, खाजगी क्षेत्रातल्या १२ बँका, आणि एका छोट्या वित्तीय बँकेचा या उपक्रमात समावेश आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com