Inauguration of Asia’s largest hospital in Faridabad, Haryana
आशिया खंडातील सर्वात मोठ्या रूग्णालयाचं हरियाणात फरीदाबाद इथं उद्घाटन
मोहाली : देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या उद्दिष्टावर केंद्र सरकार काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. पंजाबमधील मोहाली येथील, साहिबजादा अजित सिंघनगर इथं उभारण्यात आलेल्या होमी भाभाकर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते. ३०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालय उभारणीला अंदाजे ६८४ कोटी रुपये खर्च आला आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या अंतर्गत, केंद्र सरकार जिल्हा स्तरावर ६४ हजार कोटी रुपये खर्च करून आधुनिक आरोग्य सुविधा निर्माण करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितलं. याआधी देशात, भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या केवळ ७ शाखा होत्या, आता ही संख्या वाढून २१ हून अधिक झाली आहे असं पंतप्रधान पुढे म्हणाले.
रूग्णालयाइतकीच त्यातील डॉक्टरांची भूमिकाही महत्वाची असते, असं सांगत, सरकारने आतापर्यंत ५ लाख आयुष डॉक्टरांना अलोपेथिक डॉक्टर म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती मोदी यांनी यावेळी दिली.
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री भगवंत मान, केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग आणि अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
त्याआधी पंतप्रधानांच्या हस्ते काल, हरियाणामधील फरिदाबाद इथं माता अमृतानंदमयी ट्रस्टच्या अमृता रूग्णालयाचं उद्घाटनं करण्यात आलं. हे रुग्णालय आशिया खंडातील सर्वात मोठं रूग्णालय असून यात अंदाजे सव्वीसशे (2600) खाटांची सोय आहे.
पंतप्रधानांनी फरीदाबाद येथे अमृता रुग्णालयाचे उद्घाटन केल्याने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये (एनसीआर) अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेला चालना मिळेल. माता अमृतानंदमयी मठाद्वारे या रूग्णालयाचे व्यवस्थापन केले जाणार आहे. हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 2600 खाटांनी सुसज्ज असेल. सुमारे 6000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले हे अद्ययावत रुग्णालय फरीदाबाद आणि संपूर्ण एनसीआर भागातल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवेल.
पूज्य अम्मांसारख्या संतांच्या रूपात देशाच्या कानाकोपऱ्यात अध्यात्मिक ऊर्जा नेहमी पसरत असते हे राष्ट्राचे सौभाग्य आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांद्वारे शिक्षण आणि वैद्यक विषयक जबाबदाऱ्या पार पाडणारी ही प्रणाली एक प्रकारे जुन्या काळातील सार्वजनिक- खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल आहे. याला सार्वजनिक-खाजगी भागीदारी म्हणतात, पण याकडे आपण ‘परस्पर प्रयास’, परस्परांच्या प्रयत्नातून सहकार्य करणे असेही पाहतो, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com