Increase in interest rates on small savings schemes
अल्पबचत योजनांवरच्या व्याज दरांमध्ये वाढ
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासाठीचा व्याजदर ७ टक्के
- ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठीचा व्याजदर ८ टक्के
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं १ जानेवारी २०२३ पासून सुरू होणाऱ्या चालू आर्थिक वर्षातल्या चौथ्या तिमाहीसाठी विविध अल्पबचत योजनांवरच्या व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं यासंदर्भातलं निवेदन जारी केलं. यानुसार पाच वर्ष मुदतीच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासाठीचा व्याजदर ६ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांवरून ७ टक्के इतका केला आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठीचा व्याजदरही वाढून ७ पूर्णांक ६ दशांश टक्क्यावरून ८ टक्के झाला आहे.
मासिक उत्पन्न बचत खात्यासाठीचा व्याजदार आता ७ पूर्णांक १ दशांश टक्के असेल, सध्या तो ६ पूर्णांक ७ दशांश टक्के इतका आहे. यासोबतच किसान विकास पत्रासाठीही आता ७ पूर्णांक २ दशांश टक्के असा वाढीव दर लागू असेल, आणि त्यासाठी १२० महिन्यांची मुदत त्याला लागू असेल. याचप्रमाणे एक वर्ष मुदतीच्या अल्पबचत ठेवींसाठीचा व्याजदरही ५ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांवरून ६ पूर्णांक ६ दशांश टक्क्यापर्यंत वाढवला आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी खाते आणि बचत ठेवींवरच्या व्याजदरात कोणतेही बदल केलेले नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com