Increase in subsidy for army recruitment drives
भूदल सैन्यभरती मेळाव्यांसाठी अनुदानात वाढ
मुंबई : संरक्षण दलामार्फत भूदल, वायुदल आणि नौदल सैन्यभरतीसाठी सैन्य भरती मेळावे आयोजित करण्यात येतात. या भरती प्रक्रियेचा कालावधी विविध दलनिहाय अंदाजे 8 ते 10 दिवसांचा असतो. ही प्रक्रिया राबविण्यासाठी शासनामार्फत आर्थिक अनुदान देण्यात येते.
भारतीय संरक्षण दलामार्फत प्रतिवर्ष राज्यात घेण्यात येणाऱ्या 5 भूदल सैन्यभरती मेळाव्यांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात रूपये 6 लाखावरून रूपये 9 लाख इतकी वाढ करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे वायुदल, नौदल आणि महिला भूदल सैन्यभरती मेळावे घेण्यासाठी रूपये 3 लाख मंजूर करण्यात आले. त्यामुळे सन 2022-23 या वर्षामध्ये एकूण 10 मेळाव्यांसाठी एकूण रूपये 60 लाख इतकी मान्यता देण्यात आली आहे.
भूदल सैन्यभरतीच्या प्रती मेळावा रूपये 9 लाख याप्रमाणे एकूण 5 मेळाव्यास रूपये 45 लाख, भूदल महिला सैन्यभरती आणि नौदलाच्या एका मेळाव्यास रूपये 3 लाख प्रत्येकी आणि वायुदल भरतीच्या प्रती मेळावा 3 लाख प्रमाणे 3 मेळाव्याकरिता 9 लाख अशी तरतूद करण्यात आली आहे.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे मागील 2 वर्षापासून भारतीय संरक्षण दलामार्फत सैन्यभरती मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने या वर्षी सैन्यभरतीसाठी वयोमर्यादेत 2 वर्षाची सवलत दिली आहे.
उमेदवारांची वाढती संख्या तसेच वाढत्या महागाईचा विचार करता भूदल सैन्यभरती मेळाव्याकरिता अनुदानात वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नौसेना आणि वायुदलाच्या महिला भूदल सैन्य भरती मेळावे आयोजित करण्यासाठीही आर्थिक तदतूद करण्यात आली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com