The world is looking up to India as a land of opportunities – Union Minister Piyush Goyal
जग भारताकडे अफाट संधींचा देश म्हणून पाहत आहे – केंद्रीय मंत्री पियुष गोयल
पुणे येथील भारती विद्यापीठात दीक्षांत समारंभाला केले संबोधित
भारतातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अभिनव संशोधन करण्याचे विद्यार्थ्यांना केले आवाहन
पुणे/मुंबई : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी तरुणांना भारताच्या समस्यांवर उपाय शोधून अभिनव संशोधन करण्याचे आणि चिरस्थायी वारसा मागे ठेवण्याचे आवाहन केले.
आज पुण्यातील भारती विद्यापीठात दीक्षांत समारंभात भाषण देताना गोयल म्हणाले की, जग भारताकडे अफाट संधींचा देश म्हणून पाहत आहे तसेच कुशल मनुष्यबळ, शिक्षण आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रात भारत करत असलेल्या नेतृत्वाची दखल घेत आहे. “आपल्यापैकी प्रत्येकासाठी अनेक बाबतीत इथे रहायला मिळणे ही सौभाग्याची गोष्ट आहे. आता आपण जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडू ,” असे ते म्हणाले.
आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन संधींचा शोध घेण्यासाठी आणि नवीन कल्पना राबवण्यासाठी प्रोत्साहित केले. “चाकोरीबाहेरचा विचार करा! आज नवीन कल्पनांसाठी, उद्योजकतेसाठी दरवाजे खुले आहेत,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
वाहनांमधील हाय-बीम हेडलाइट्समुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्याची कल्पना घेऊन आलेल्या तरुणांच्या गटाशी झालेल्या संवादाचा अनुभवही त्यांनी सामायिक केला. ही कल्पना वरकरणी साधी वाटू शकते परंतु त्या उपायामुळे अपघात टाळता येऊ शकतात किंवा जीव वाचवता येऊ शकतात.
अनेक स्टार्टअप्स सोप्या आव्हानांवर उपाय शोधत असल्याची आणि युनिकॉर्न्स म्हणून यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे देखील गोयल यांनी सांगितली “एक साधी कल्पना किंवा उपाय स्टार्ट-अपचे बीज रोवू शकतो” असे ते पुढे म्हणाले.
या धर्तीवर नवीन शैक्षणिक धोरण कसे आखले आहे , जे विद्यार्थ्यांना वेगळा विचार करण्यासाठी प्रवृत्त करते याबद्दलही त्यांनी सांगितले. “नवीन शैक्षणिक धोरण प्रत्येकाला प्रयोग करण्यास आणि नवीन कल्पना शोधण्यास प्रोत्साहन देते,” असे ते म्हणाले.
गोयल यांनी भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांना आदरांजली वाहिली. डॉ.कदम यांचा चैतन्यशील स्वभाव आणि नवनवीन प्रयोग करण्याची त्यांची इच्छा याबाबत आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
“मी तुम्हा सर्वांना देशाचे भविष्य घडवण्यात सहभागी होण्याचे आवाहन करतो. मी तुम्हाला आवाहन करतो की कठीण पर्याय निवडा, सोपे निवडू नका. डॉ. कदम यांच्यासारखा चिरस्थायी वारसा मागे सोडा,” असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले.
कोविड-19 महामारीच्या काळात संस्थेने दिलेल्या योगदानाची गोयल यांनी प्रशंसा केली. “तुमच्या डॉक्टरांनी आणि संस्थांनी केलेल्या कार्याबद्दल आणि भारतातील पहिली डीएनए लस विकसित करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल भारतीय लष्कर आणि आरोग्य मंत्रालयाने केलेल्या अभिनंदनाबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.”
हडपसर न्युज ब्युरो