India has reached the milestone of ‘200 crore’ Covid-19 vaccinations
भारताने गाठला ‘200 कोटी’ कोविड-19 लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा
देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत 200 कोटी लस मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधानांनी नागरिकांचे केले अभिनंदन
“भारताची लसीकरण मोहीम व्याप्ती आणि वेग याबाबतीत अतुलनीय”
ही असामान्य कामगिरी इतिहासात नोंदली जाईल: डॉ मनसुख मांडविया
नवी दिल्ली : भारताच्या देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज ऐतिहासिक कामगिरी करत 200-कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, देशभरात एकूण 2,00,00,15,631 मात्रा देण्यात आल्या आहेत. 2,63,26,111 सत्रांतून हा टप्पा गाठण्यात आला.
या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे एका ट्विट संदेशांद्वारे अभिनंदन केले. भारताची लसीकरण मोहिम “व्याप्ती आणि वेग यामध्ये अतुलनीय” आहे असे त्यांनी म्हटले आहे.
केवळ 18 महिन्यांत ही ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही देशवासीयांचे अभिनंदन केले. “ही विलक्षण कामगिरी इतिहासात नोंदवली जाईल” असे ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनीही, मानवतेच्या सेवेत हा नवा विक्रम प्रस्थापित करण्यात, आरोग्य सेवा कर्मचार्यांचे कठोर परिश्रम, संकल्प आणि कल्पकतेबद्दल आभार मानले.
भारताची देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिम 16 जानेवारी 2021 रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते सुरू करण्यात आली. पंतप्रधानांच्या सक्रिय आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारताने “मेक-इन-इंडिया” आणि “मेक-फॉर-वर्ल्ड” धोरणा अंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या संशोधन, विकास आणि निर्मितीला पाठिंबा दिला. यासह, भारताने लसीकरणाच्या भौगोलिक व्याप्तीचे मूल्यमापन करण्यासाठी CoWIN सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, लसींनंतर काही दुष्परिणाम आढळल्यास त्याचा मागोवा, सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना त्यांचे लसीकरण वेळापत्रक पाळता यावे यासाठी एकच संदर्भ बिंदू प्रदान करणे तसेच वैज्ञानिक पुरावे आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींवर आधारित लसिकरणाला प्राधान्य दिले.
या देशव्यापी मोहीमेत क्षमता निर्मिती सुनिश्चित करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय देखील केले गेले. कोविड19 लसींच्या साठवणुकीसाठी आणि वाहतुकीसाठी विद्यमान पुरवठा साखळी सांधण्यात आणि सक्षम करण्यात आली. तसेच, लस वितरणावर प्रभावी देखरेख ठेवण्यात गेली. उपलब्ध लस मात्रा आणि सिरिंजच्या योग्य वापरावर भर दिला गेला.
भारतातील नागरिकांना देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत मोफत आणि ऐच्छिक लस उपलब्ध व्हावी यासाठी हर घर दस्तक, कार्यालयामध्ये लसीकरण केंद्र, शाळा आधारित लसीकरण, ओळखपत्रे नसलेल्या व्यक्तींचे लसीकरण, घराजवळील लसीकरण केंद्र आणि फिरते लसीकरण चमू यांसारखे अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. 71% कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण केंद्र ग्रामीण भागात स्थित आहेत तर 51% पेक्षा जास्त लसीच्या मात्रा महिलांना देण्यात आल्या आहेत. भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने भौगोलिक आणि लैंगिक समानता देखील सुनिश्चित केली आहे.
देशभरात कोविड रुग्णसंखेत घट झाली असली तरीही, सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 100 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी जवळपास 9 महिने लागले आणि 200 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 9 महिने लागले यावरून हे समजून येते. 17 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरणाने 2.5 कोटी मात्रांचा एका दिवसातला विक्रमी लसीकरण टप्पा गाठला होता.
15 जुलै 2022 रोजी, केंद्र सरकारने सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर (CVCs) सर्व पात्र प्रौढ नागरिकांना मोफत क्षमता वृद्धी मात्रा देण्यासाठी 75 दिवसांचा ‘कोविड लसीकरण अमृत महोत्सव’ सुरू केला. आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून, ‘मिशन मोड’ मध्ये कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या क्षमता वर्धक मात्रा लसीकरणाची गति वाढावी या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणाबाबत योग्य माहिती आणि समावेशक मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करण्यासाठी एक सुव्यवस्थित संवाद धोरण देखील तयार केले आहे. यामुळे लसीबद्दलचा संकोच दूर करण्यात मदत झाली, लसीबद्दलची उत्सुकता वाढली आणि कोविड योग्य वर्तनासाठी लोकांना प्रोत्साहन दिले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com