India is a sensitive country helping other countries – Piyush Goyal
भारत इतर देशांना मदत करणारा संवेदनशील देश – पियुष गोयल
नवी दिल्ली : भारत औषध निर्मिती क्षेत्रातली एक महासत्ता आहेच, पण त्याबरोबरच जगातल्या इतर देशांना मदत करणारा एक संवेदनशील देशही आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष
गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयडीएमए अर्थात, भारतीय औषध निर्माता संघटनेच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते.
आयडीएमएनं आतापर्यंत केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. सर्वांनी एकमेकांना आधार द्यावा आणि अधिक चांगली कामगिरी होण्यासाठी योग्य पर्यावरण निर्माण करावं. त्यातून स्पर्धेचा फटका बसणार नाही, उलट उत्पादनाची संख्यात्मक, गुणात्मक वाढ होईल आणि उत्पादन खर्चही कमी होईल, असं ते म्हणाले.
कोविड काळात २० पेक्षा जास्त देशांना महत्त्वाच्या औषधांचा पुरवठा करुन भारतीय औषध निर्मिती उद्योगानं गौरवास्पद कामगिरी केली आहे, असं ते म्हणाले. हे जागतिक संकट आपण ज्या पद्धतीनं हाताळलं त्यावरुन औषध निर्मिती क्षेत्रात आपण आत्मनिर्भर झालो आहोत असं नक्कीच म्हणता येतं, असंही ते म्हणाले.
औषध निर्मिती उद्योगानं २५ अब्ज डॉलर्सची निर्यात केली असून, निर्यातीतलं हे जगातलं पाचव्या क्रमांकाचं सर्वात मोठं योगदान आहे, असं त्यांनी सांगितलं. देशातल्या ८० कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य पुरवठा करुन अन्न सुरक्षा म्हणजे काय हे जगाला दाखवून दिलं आहे, असं गोयल म्हणाले.
जागतिक पुरवठा साखळीच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय उद्योगांनी सतर्क रहावं असा इशाराही त्यांनी दिला. देशात पुरवठा साखळी सुरळीत राखण्यासाठी कमी जास्तीच्या बाबी या उद्योगांनी निश्चित कराव्या, असं ते म्हणाले. त्यानंतर औषध निर्मिती क्षेत्रातल्या उद्योजकांशी त्यांनी थेट संवाद साधला, आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
Hadapsar News Bureau