India ready to become a global hub in content creation and post-production process: Information and Broadcasting Minister Anurag Thakur
आशय निर्मिती आणि निर्मिती पश्चात प्रक्रिया क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्यासाठी भारत सज्ज आहे : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर
माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचा आकार 2025 पर्यंत 4 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात स्टार्ट-अप संस्कृती बळकट करण्याचे केले आवाहन
पुणे : देशातील डिजिटल पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार होत आहे आणि एव्हीजीसी (ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीमुळे , माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचे पसंतीचे निर्मिती पश्चात प्रक्रिया क्षेत्राचे महत्वाचे केंद्र बनवण्याची क्षमता भारतात आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले.
सिम्बॉयोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठच्या वतीने पुण्यात सिम्बॉयसिस विद्यापीठात ‘माध्यमे आणि मनोरंजन या क्षेत्रातील बदलते परिप्रेक्ष्य-2022 या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आपल्या भाषणात बोलत होते. “एव्हीजीसी क्षेत्रासाठी एक भक्कम डिजिटल पाया देशभरात उदयाला येत आहे आणि देशांतर्गत आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी जागतिक दर्जाची सर्जनशील प्रतिभा विकसित करण्यासाठी सरकारने एव्हीजीसी क्षेत्रासाठी कृती दलाची स्थापना केली आहे.”, असे त्यांनी सांगितले.
माध्यम आणि मनोरंजन कार्यक्षेत्र हे एक उदयोन्मुख क्षेत्र आहे, 2025 पर्यंत या क्षेत्राचा आकार 4 लाख कोटी रुपये असेल आणि 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्स किंवा 7.5 लाख कोटी रुपये आकारमानाच्या उद्योगांपर्यंत पोहोचेल, असे ते म्हणाले. भारत सरकारने 12 महत्वाच्या सेवा क्षेत्रांमध्ये ध्वनी -चित्र सेवा सुरु केल्या आहेत आणि शाश्वत विकासाच्या उद्देशाने प्रमुख धोरणात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
आपण दर्जेदार आशय निर्मितीच्या डिजिटल युगात प्रवेश करत असताना रेडिओ, चित्रपट आणि मनोरंजन उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. “चित्रफीत संकलन , कलर ग्रेडिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स ), ध्वनी रचना , रोटोस्कोपिंग, 3डी मॉडेलिंग इ. या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उदयाला आल्या आहेत.. “या क्षेत्रातील प्रत्येक नोकरीसाठी विशिष्ट कौशल्ये आणि क्षमतांची आवश्यकता असते.यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन या क्षेत्राच्या गरजेनुसार कार्यक्रम आखणे अत्यावश्यक आहे,”असे ते म्हणाले. भारतीय विद्यार्थी हे या क्षेत्रातील आगामी तंत्रज्ञानाच्या कल यासोबत सुसंगत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार खाजगी क्षेत्रासोबत नव्या भागीदारीच्या देखील शोधात आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाला दिलेल्या पाठबळाने आणि उत्साहामुळे तरुणांच्या महत्त्वकांक्षेला पंख दिले आहेत आणि तरुणांना सक्षम बनवण्याची पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षा कौशल्य भारत अभियानाने साकार केली आहे , 40 कोटी तरुणांना बाजारपेठेशी संबंधित कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे, असे ठाकूर म्हणाले.
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचा नव्या भारताच्या जडणघडणीत मोठा सहभाग आहे. या पार्श्वभूमीवर आपला विचार आणि बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे असे सांगत ठाकूर पुढे म्हणाले की आपला स्वतःवर विश्वासअसला तर जग आपल्यावर विश्वास ठेवू शकतों आणि या आत्मविश्वासानेच भारत आत्मनिर्भर बनू शकतो
2021 च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान हाती घेण्यात आलेल्या उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत’ प्रकल्पाविषयी बोलताना ठाकूर यांनी सांगितले की, यातील अनेक प्रतिभावंतांनी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात सर्जनशीलपणे योगदान दिले आहे आणि काहींनी यशस्वी स्टार्ट-अप स्थापन केले आहेत. एफटीआयआय आणि एसआरएफटीआय सारख्या आघाडीच्या चित्रपट संस्थानी तयार केलेल्या प्रतिभावंतांमधून स्टार्टअप्स उदयाला येतील अशी आशा आहे, असे मंत्री म्हणाले.
भारत जागतिक आशयाचे केंद्र- अनुराग ठाकूर
डिजिटल इंडियासह भारतातील आशय तयार करण्याचा उद्योग व्यापक उन्नतीतून गेला आहे, असे सांगताना ठाकूर म्हणाले की, दर्जेदार आशय, सहजसाध्य उपलब्धता आणि उत्सुक प्रेक्षक आणि वाचक यामुळे भारत स्वतःची यशोगाथा स्वतःच सांगायला सज्ज होत आशय तयार करण्याचे केंद्र बनला आहे. ठाकूर पुढे म्हणाले की, सध्या मनोरंजन क्षेत्रातील मुख्य कलाकार हेच आमचे केंद्रबिंदू असतो, मात्र त्यापलिकडे जाऊन पडद्यामागे काम करणाऱ्या तंत्रज्ञांच्या प्रयत्नांची पुरेशी दखल घेतली जाऊन त्यांना पुरस्कारांनी गौरवले पाहिजे.
ऑस्कर आणि बाफ्ता पुरस्कार विजेते ध्वनी तंत्रज्ञ रसुल पोकुटी हे राष्ट्रीय परिषदेत आणखी एक सन्माननीय अतिथी होते. ते म्हणाले की, शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना कौशल्यसंचाच्या बाबतीत विकसित करण्याबरोबरच बाहेरच्या जगाला तोंड देण्यासाठी ज्ञान देण्याच्या आपल्या प्राचीन परंपरेचे पुनरूज्जीवन केले पाहिजे.
राष्ट्रीय परिषदेत अनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्स या क्षेत्रातील उभरत्या संधी, ओटीटी, दूरचित्रवाणी, चित्रपट निर्मिती, अग्युमेंटेड रियालिटी अर्थात संवर्धित वास्तव आणि वर्च्युअल रियालिटी अर्थात आभासी वास्तव संबंधित माध्यम कौशल्य हे या राष्ट्रीय परिषदेतील चर्चेचे मुख्य विषय होते. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील नामवंत मंडळी, सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस बी मुजूमदार, प्रकुलगुरू डॉ. स्वाती मुजूमदार, उपकुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर आदींचा उपस्थितांमध्ये समावेश होता.