India should lead the world in the field of wellness – Governor Bhagat Singh Koshyari
भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : आज ‘वेलनेस’ अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. ‘वेलनेस’ म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे. ‘वेलनेस’च्या क्षेत्रात भारत पूर्वीपासूनच सामर्थ्यवान असून देशाने या क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. १५) राजभवन येथे फिटनेस व वेलनेस उद्योग क्षेत्रातील ४० व्यक्तींना ‘ग्लोबल वेलनेस डे’ पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रेखा’ज झेप फाउंडेशन व वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला ‘वेलनेस’ राजदूत रेखा चौधरी, चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे व अभिनेते विद्युत जामवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
निरोगी जीवनासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या संपन्न असणे पुरेसे नाही तर मानसिक स्वास्थ्य देखील विशेष महत्त्वाचे आहे. आज अमेरिकेत संपन्नता असली तरीही मानसिक अस्वास्थ्यामुळे लहान मुले व युवक बंदुकीच्या मदतीने हिंसाचार करीत असल्याच्या घटना घडत आहेत.
निरोगी जीवनासाठी योग, ध्यानधारणा, शांती, संगीत व संतुष्टी आवश्यक असल्याचे मत राज्यपालांनी व्यक्त केले. या दृष्टीने एकाग्रता व तितिक्षा देखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आज योगामुळे जग भारताकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे भारताने निरामय जीवन जगण्यासाठी जगाला मार्गदर्शन करावे असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी अभिनेते विद्युत जामवाल, स्मिता ठाकरे, फारुख कबीर, सोनाली सेहगल, दारासिंह खुराणा, आकांक्षा सिंह, दर्शन कुमार, मानव मंगलानी, अब्दुल कादर, रेणू कांत, शिला अय्यर आदींचा सत्कार करण्यात आला.
हडपसर न्युज ब्युरो