Nobody can stop Indian economy from becoming the third largest in the world by 2027 – Union Minister Amit Shah
2027 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या क्रमांकावर येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
– केंद्रीय मंत्री अमित शाह
चेन्नई : राज्यातील वैद्यकीय आणि तंत्रज्ञान शिक्षण तमिळ भाषेतून उपलब्ध करुन देण्याचे आवाहन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तामिळनाडू सरकारला केले. तामिळनाडूत इंडिया सिमेंट्सच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला ते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की मी तामिळनाडू सरकारला वैद्यकीय आणि तंत्रज्ञान शिक्षणात तमिळ हे शिक्षणाचे माध्यम म्हणून उपलब्ध करण्याचे आवाहन करतो. अनेक राज्य सरकारांनी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत आणि विद्यार्थीही आपापल्या मातृभाषेत शिकू लागले आहेत, त्यामुळे त्यातून विद्यर्थ्यांना शैक्षणिक लाभ होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तमिळ ही जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असून तमिळ भाषेचे जतन आणि संवर्धन ही संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
भारत 2025 पर्यंत 5 ट्रिलियन म्हणजेच पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी या कार्यक्रमात केला. गेल्या आठ वर्षांत, भारताने ब्रिटनला मागे टाकून 11 व्या क्रमांकावरून उडी घेत जगातली 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा पराक्रम केला आहे.
मॉर्गन स्टॅन्लेने नुकत्याच केलेल्या अभ्यासातही असे भाकीत केले आहे की 2027 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसरे स्थान मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे गृहमंत्र्यांनी या सोहळ्यात बोलताना सांगितले.
राजकीय स्थैर्य आणि पारदर्शक कारभारामुळे भारत आज वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की भारताची ही कामगिरी आज संपूर्ण जगाने मान्य केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताचे वर्णन, आर्थिक निराशेच्या अंधारातला एक तेजोमय प्रकाश किरण असे केले असल्याचेही अमित शहा यांनी नमूद केले.
IMF च्या अंदाजानुसार 2022-23 म्हणजेच विद्यमान आर्थिक वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातल्या (GDP) 6.8 टक्के वाढीसह भारत G-20 राष्ट्र समुहात दुसऱ्या क्रमांकावर असेल, असेही त्यांनी सांगितले.
तर 2023-24 मध्ये भारत जीडीपीतल्या 6.1 टक्के वाढीसह, G-20 समुहात पहिल्या क्रमांकावर असेल, असा अंदाजही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केल्याचे अमित शहा म्हणाले .
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com