Indian Language Festival at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतीय भाषा उत्सव
मराठी व पाली, संस्कृत व हिंदी विभागाकडून विविध उपक्रम: भाषाप्रेमींसाठी खुले प्रदर्शन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय भाषा दिनानिमित्त भारतीय भाषा उत्सव साजरा केला जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भारतीय भाषा उत्सव उपक्रमांतर्गत दोन्ही विभागांकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी मराठी विभागात काव्यवाचन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शन, माझी भाषा माझे हस्ताक्षर आदी स्पर्धा विभागात ११ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजल्यापासून घेण्यात येणार आहेत.
तर याच दिवशी पाली व बौद्ध अध्ययन विभागात पाली, संस्कृत, गांधारी व सैंधवी प्राकृत, तिबेटन, थाई, सिंहली व बर्मी भाषा तसेच देवनागरी, सैंधवी, तिबेटी, थाई, बर्मी, व सिंहली लिपींमधील छापील ग्रंथांचे व हस्तलिखितांचे खुले प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना विविध प्राचीन लिपींमध्ये आपली स्वाक्षरी करण्याची संधी मिळणार आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असून सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत खुले राहील. प्रदर्शनाचे स्थळ पाली व बौद्ध अध्ययन विभाग,सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसर येथे आहे.
यावेळी हिंदी विभागाकडून रांगोळी स्पर्धा तसेच विविध भाषा येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर संस्कृत विभागाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ.विजय खरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com