The time has come for Indian manufacturing to be the best in the world
भारतीय उत्पादन जगात सर्वोत्तम ठरण्याचा काळ आला आहे
– केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल
भारतीय उत्पादने जगातील सर्वोत्तम गुणवत्तेची ठरण्याची वेळ : केंद्रीय वाणिज्य, उद्योग तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे मुंबईतील एसआरटीईपीसी वार्षिक निर्यात पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन
मुंबई : केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत ‘द सिंथेटिक अँड रेयॉन टेक्सटाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’ (SRTEPC) तर्फे आयोजित निर्यात पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
आपल्याला प्रत्येक मुक्त व्यापार कराराचा अभ्यास करून इतर देशांच्या गरजा चांगल्या प्रकारे समजून घ्याव्या लागतील. असे वाणिज्य आणि उद्योग आणि वस्त्रोद्योग मंत्री उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. “निर्यात प्रोत्साहन परिषदांनी इतर देशांमध्ये दुबईसारख्या ठिकाणी कार्यालये उघडली पाहिजेत. आपल्याला चाकोरी बाहेरचा विचार करावा लागेल.” असेही ते म्हणाले.
गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. “आपली गुणवत्ता जगात सर्वोत्तम होण्याची वेळ आली आहे. भारतातील आणि जगभरातील ग्राहकांची ही मागणी आहे. देशांतर्गत गुणवत्ता आणि निर्यात गुणवत्ता – अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्तेची उत्पादने तयार करण्याची वेळ आता संपली आहे, असेही ते म्हणाले. 2,000 उत्पादने लवकरच गुणवत्ता नियंत्रणाखाली येतील. कमी दर्जाची उत्पादने वापरणे आपण थांबवायला हवे. आपल्याला उत्पादनाचे प्रमाण वाढवायचे आहे आणि गुणवत्तेवर देखील लक्ष केंद्रित करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
कोणत्या उत्पादनांवर गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी करणे आवश्यक आहे, याबाबत उद्योगांनी सरकारला मार्गदर्शन करावे असा सल्ला मंत्र्यांनी दिला.
मंत्री महोदयांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. पुरस्कार विजेते खरे तर देशाची सेवा करत आहेत आणि हा पुरस्कार त्यांच्या परिश्रमाला दिलेली एक पोचपावती, छोटीशी ओळख आहे, अशा शब्दांत त्यांनी विजेत्यांचा गौरव केला.
व्यवसायाचे जागतिक स्थान असूनही एसआरटीईपीसीच्या सदस्यांनी चांगली कामगिरी केली आहे, असे एसआरटीईपीसीचे अध्यक्ष धीरज रायचंद शहा यावेळी म्हणाले . निर्यात वाढवण्यासाठी उद्योगाला अधिक परिश्रम करावे लागतील, संशोधन आणि विकासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल आणि पुढील वर्षी उद्योगाने किमान 20% निर्यात वाढवावी लागेल, असे ते म्हणाले.
एसआरटीईपीसीच्या इतिहासात वाणिज्य आणि उद्योग मंत्री एसआरटीईपीसी निर्यात पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार देत असल्याची ही पहिलीच वेळ आहे, असे एसआरटीईपीसीचे तत्कालिन माजी अध्यक्ष रोनक रुघानी म्हणाले. वर्षानुवर्षे परिषद आणि उद्योगांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.
या कार्यक्रमाला वस्त्रोद्योगातील विविध क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com