India’s G20 Presidency is a big opportunity to focus on Global Good, the welfare of the world
जी-ट्वेन्टी परिषदेच्या निमित्तानं देशभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्याचे आवाहन
नवी दिल्ली : १ डिसेंबरपासून जी २० देशांच्या समुहाचं अध्यक्षपद भारताकडे येणार आहे. जगातल्या २ तृतीयांश नागरिकांचा समूह, जागतिक व्यापाराचा तीन चतुर्थांश हिस्सा आणि जगाच्या जीडीपीचा ८५ टक्के हिस्सा या देशांचा आहे. एवढ्या मोठ्या आणि सामर्थ्यवान समुहाचं अध्यक्षपद भुषवणं ही देशासाठी आणि देशातल्या नागरिकांसाठी अभिमानाची आणि जबाबदारीची बाब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात ही जबाबदारी भारताकडे आल्यानं हे विशेष असल्याचं ते म्हणाले. आगामी काळात देशभरात जी-२० शी निगडीत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. जगभरातल्या विविध देशातले लोक देशाच्या विविध राज्यात जाणार आहे. त्यांना देशातली सांस्कृतिक विविधता दाखवावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशातल्या नागरिकांना केलं.
यावेळी जी २० च्या तयारीसाठी देशात होत असलेल्या तयारीची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. तसंच या तयारीचं कौतुक करणाऱ्या देशातल्या नागरिकांचे आभार मानले.
१८ नोव्हेंबरला विक्रम एस या देशात तयार झालेल्या पहिल्या खासगी रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. या रॉकेटची वैशिष्ट्यं प्रधानमंत्र्यांनी सांगितली.
भारत आणि भूतान यांनी एकत्रितरित्या बनवलेल्या अवकाश यानाचं काल प्रक्षेपण करण्यात आलं. यामुळे भूतानला नैसर्गिक साधनसंपत्तीचं अधिक चांगलं व्यवस्थापन करता येईल, असं प्रधानमंत्री म्हणाले.
देशातल्या तांत्रिक प्रगतीचा आढावा घेताना प्रधानमंत्री म्हणाले, हिमाचल प्रदेशातल्या किन्नौरमधून काही दिवसांपूर्वी ड्रोनच्या माध्यमातून सफरचंदांची वाहतूक झाली. बर्फ पडल्यावर या भागातली वाहतूक ठप्प होत असली तरी ड्रोनमुळं सफरचंदांच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही. यामुळं वाहतूक खर्चात बचत होईल आणि सफरचंदांचं नुकसानही कमी होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
देशातल्या संगीताविषयी परदेशातल्या नागरिकांमध्ये असलेल्या उत्सुकतेची माहिती प्रधानमंत्र्यांनी आज मन की बात मधून दिली. गेल्या ८ वर्षात देशातून होणारी वाद्यांची निर्यात साडे ८ पटीनं वाढली आहे. तर इलेक्ट्रॉनिक वाद्यांची निर्यात ६० पटीनं वाढल्याची माहिती त्यांनी दिली. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि ब्रिटन सारख्या देशांमध्ये प्रामुख्यानं ही निर्यात होते आहे.
दक्षिण अमेरिकेतल्या गयानामध्ये साजऱ्या होत असलेल्या होळीच्या सणाविषयीही प्रधानमंत्र्यांनी आज मन की बात मधून माहिती दिली. या ठिकाणी फगवा संगीतात राम आणि कृष्ण यांच्याशी संबंधित विविध गाणी गायली जातात. फिजीमध्येही हजारो भजनीमंडळ असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय देशातल्या विविध भागात होत असलेल्या विविध समाजोपयोगी कामांचा आढावाही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मधून घेतला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com