Prime Minister asserted that India’s history is not a story of slavery but a saga of bravery, sacrifice and fearlessness.
भारताचा इतिहास म्हणजे गुलामगिरीची कहाणी नसून शौर्य, त्याग आणि निर्भयतेची गाथा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली : भारताचा इतिहास म्हणजे गुलामगिरीची कहाणी नसून शौर्य, त्याग आणि निर्भयतेची गाथा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आसाममधले अहोम सेनापती लचित बारफुकन यांच्या ४०० व्या जयंती महोत्सवाचा सांगता समारंभ दिल्लीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.
देशातील अनाम वीरांचा यथोचित पद्धतीने सन्मान करण्याबाबत पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेला अनुसरून, लचित बोरफुकन यांच्या 400व्या जयंतीनिमित्त त्यांचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात आला. आसामच्या अहोम राजवंशातील रॉयल आर्मीमध्ये लोकप्रिय जनरल असलेले लचित बोरफुकन यांनी मुघलांचा पराभव करून, औरंगजेबाच्या अधिपत्याखालील मुघलांच्या राज्य विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेला लगाम घातला.
पंतप्रधान म्हणाले, “देश स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, याच काळात आपण लचित बोरफुकन यांची 400 वी जयंती साजरी करत आहोत.” शूरवीर लचित यांच्या धैर्याला आसामच्या इतिहासातील वैभवशाली अध्याय संबोधत, पंतप्रधान म्हणाले, “भारताची अनादि संस्कृती, शाश्वत धैर्य आणि अनंत काळापर्यंतच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करत असताना मी या थोर परंपरेला सलाम करतो.”
गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ती मिळवण्याच्या तसेच भारतीय वारशाबाबत अभिमान बाळगण्याच्या भारताच्या निश्चयाचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारत केवळ त्याच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करत नाही तर आपल्या इतिहासातील अनाम वीर आणि वीरांगनांच्या कार्याची आवर्जून दखल देखील घेत आहे.
“लचित बोरफुकन यांच्यासारखे भारतमातेचे अमर सुपुत्र म्हणजे अमृत काळातील निश्चय पूर्ण करण्यासाठीची प्रेरणा आहेत. ते आपल्याला आपल्या इतिहासाची ओळख आणि वैभव यांच्याशी अवगत करतात आणि आपण देशाप्रती समर्पण करण्यासाठी दिशा देखील दाखवतात,” पंतप्रधान पुढे म्हणाले.
चुकीच्या पद्धतीनं लिहिलेला इतिहास पुन्हा नव्यानं लिहायची गरज त्यांनी अधोरेखित केली. ब्रिटिश काळानंतर झालेल्या चुका आता सुधारल्या जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
लचित बारफुकन यांनी आपल्याला देशभक्तीची शिकवण दिल्याचं ते म्हणाले. तलवारीच्या जोरावर भारताचा शाश्वत वारसा मिटवू पाहणाऱ्यांना कडक उत्तर देणं भारताला चांगलंच जमतं , असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
लचित बारफुकन हे मूर्तिमंत शौर्याचं प्रतीक आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ईशान्य भारताच्या विकासासाठी प्रधानमंत्री मोदी सतत प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com