Efforts to inspire budding athletes to perform well
उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न
-विभागीय आयुक्त सौरभ राव
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३
पुणे : राज्यातील प्रतिभासंपन्न खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहून राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी-म्हाळुंगे येथे २ ते १२ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उदघाटन ५ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
विधानभवन सभागृह पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक संजय सबनीस आदी उपस्थित होते.
श्री. राव म्हणाले, स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आणि खेळाडूंमधील क्रीडा कौशल्य वाढीस लागण्यास मदत होईल.
महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे आयोजन राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असून या स्पर्धेमध्ये ३९ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राज्यातील १० हजार ४५६ खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक , व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
स्पर्धेकरीता १८ वर्षांवरील वयोगटातील खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकाराच्या एकविध क्रीडा संघटनेमार्फत त्या-त्या क्रीडा प्रकारातील राज्यातील सर्वोत्कृष्ट आठ संघांची व खेळाडूंची निवड करण्यात आलेली असून हे निवडक आठ जिल्ह्यांचे संघ महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे संपन्न होणार असून या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेकरीता क्रीडा ज्योत तयार करण्यात आली आहे. मुख्य क्रीडा ज्योत ही रायगड येथून प्रज्वलित केली जाईल. राज्याच्या क्रीडा विभागांतर्गत एकूण आठ विभाग आहेत. प्रत्येक विभागीय मुख्यालयाचे ठिकाणापासून क्रीडा ज्योत पुणे येथे आणली जाणार आहे.
या सर्व ज्योतींचे एकत्रिकरण करून ही क्रीडा ज्योत मिरवणूकीने पुणे शहरातून शिवछत्रपती क्रीडा संकुलात आणली जाईल व स्पर्धेच्या उद्घाटनाचे वेळी मुख्य कार्यक्रमस्थळी असलेली ज्योत प्रज्वलित केली जाईल. याकरीता आवश्यक ते नियोजन करण्यात आलेले आहे.
सदर स्पर्धेची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात आलेली असून सर्व स्पर्धास्थळे स्पर्धा आयोजनाकरीता सज्ज झालेली आहेत. शासनाचा क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील ३९ क्रीडा प्रकारांच्या क्रीडा संघटना अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरीता झटत आहेत.
खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, क्रीडांगणे, खेळाडूंची स्पर्धेकरीता वाहतूक, स्वयंसेवक, पदके आदी बाबी सर्वोत्कृष्ट स्वरूपाच्या होतील याकरीता प्रत्येक बाबीकडे जातीने लक्ष पुरविले जाते आहे.
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक पदकांची कमाई करणाऱ्या जिल्ह्यास सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान व ट्रॉफी दिली जाणार आहे.
या स्पर्धा आयोजनास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली असून १९ कोटी रुपये इतकी तरतूद देखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे, या स्पर्धेकरीता कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही याची ग्वाही शासनाने दिलेली असून राज्यातील खेळाडूंना त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखविण्याकरीता आवाहन केले आहे.
या स्पर्धा आयोजनाच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना त्यांचे क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याकरीता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करण्यात येईल व भविष्यात या खेळाडूंच्या कामगिरीचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल, असेही श्री. राव यांनी सांगितले.
श्री.दिवसे म्हणाले, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अशा खेळाडूंच्या गुणवत्तेला स्पर्धेद्वारे चांगली संधी मिळेल. खेळाडूंची माहिती सॉफ्टवेअरद्वारे संकलित करण्यात येणार आहे. भविष्यात क्रीडा विकासाचे उपक्रम राबविताना याचा उपयोग होऊ शकेल.
श्री.शिरगावकर म्हणाले, ही स्पर्धा राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी नवी पहाट ठरणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात क्रीडा विकासाला पोषक वातावरणाची निर्मिती होईल. महाराष्ट्र ऑलिम्पिक देशातील सर्वात मोठी राज्यस्तरीय स्पर्धा असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकांचे अनावरण करण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com