Interim Result of Scholarship Exam Released
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) तसेच शासकीय, आदिवासी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉगिनमधून तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर बघता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये १७ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
गुण पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरावी लागेल. यासाठी केवळ ऑनलाईन अर्जच करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सहायक आयुक्त स्मिता गौड यांनी दिली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com