शिवसेनेतल्या सहकाऱ्यांनीच अविश्वास दाखवणं, अत्यंत क्लेशदायक – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

It is very distressing for Shiv Sena colleagues to show distrust – Chief Minister

शिवसेनेतल्या सहकाऱ्यांनीच अविश्वास दाखवणं, अत्यंत क्लेशदायक – मुख्यमंत्री

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी शिवसेनेतल्या आपल्याच सहकाऱ्यांनी आपल्यावर अविश्वास दाखवणं, ही बाब अत्यंत क्लेशदायक असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

या सर्व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष समोर येऊन, आपल्याशी संवाद साधल्यास, आपण तत्काळ मुख्यमंत्रिपद तसंच शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडण्यास तयार असल्याचं, ते म्हणाले. लोकशाहीमध्ये संख्या ज्यांच्याकडे अधिक असते तो जिंकतो, शिवसैनिकांनी आपल्यावर अविश्वास ठरावाची वेळ येऊ देऊ नये, एकाही शिवसैनिकाचं मत आपल्याविरुद्ध गेल्यास, ते आपल्यासाठी लाजिरवाणं ठरेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेना आणि हिंदुत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, शिवसेना आणि हिंदुत्व वेगळं होऊ शकत नाही, असं ठाकरे यांनी नमूद केलं. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असं भासवलं जात आहे. मात्र शिवसैनिकांना जे मिळालं, ते बाळासाहेबांच्यानंतरच्या शिवसेनेनं दिलं, हे लक्षात घ्यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले. २०१४ साली सुद्धा जी शिवसेना लढली होती, आणि एकट्याच्या ताकतीवरती प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आणले, त्यातले काही नंतर जे मंत्री झाले. ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती.

गेली अडीच वर्ष मी स्वत: मुख्यमंत्री आहे. माझ्या सोबत पहिल्या आणि आताच्या मंत्रिमंडळातले जे काही सहकारी आहेत, ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत. शिवसेना हिंदुत्व, शिवसेना कोणाची, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलंय का, शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही का, मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेनाच पाहिजे. मग मधल्या काळामध्ये जे काही सगळं मिळालं, ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनं दिलं. हे मी म्हणेन, पुन्हा तुम्ही लक्षात ठेवा. ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’, या म्हणीप्रमाणे सहकाऱ्यांनी वागू नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ज्या सहकाऱ्यांना माझ्या मुख्यमंत्रिपदावर आक्षेप आहे, त्यांनी तसं स्पष्ट सांगावं, असं आवाहन ठाकरे यांनी केलं.

मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यावर पुढच्या एक दोन महिन्यातच कोविडचा प्रादुर्भाव झाला. त्या संकटातुनही जनतेच्या सहकार्याने आपण बाहेर पडल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्यावर विश्वास दाखवून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी टाकली, प्रशासनानेही आपल्याला सांभाळून घेतलं, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

आपल्या या संवादातच मुख्यमंत्र्यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडत असल्याचं सांगितलं, त्यानंतर काही वेळानं ते शासकीय निवासस्थान सोडून मातोश्री या निवासस्थानी गेले. यावेळी वर्षा बंगल्यासमोर तसंच रस्त्याच्या दुतर्फा शिवसैनिकांनी गर्दी केली होती. शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने हा परिसर दणाणून गेला होता.

मुख्यमंत्र्यांच्या या संबोधनानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक असल्याचं ट्वीट केलं आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचं, शिवसेनेचं मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार योगेश कदम यांच्यासह धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या शिवसेना समर्थक अपक्ष आमदार मंजुळा गावित आणि त्यांचे पती शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावित गुवाहाटीला जाऊन एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले.

शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे काल घरी परतले. अकोला इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, भाजपच्या संगनमताने एकनाथ शिंदे यांनी हे षडयंत्र रचलं, असा आरोप केला. सूरतमध्ये असतांना आपल्याला रक्तदाब किंवा हृदयासंदर्भात कोणतीही समस्या नव्हती, तरीही आपल्याला गुजरात पोलिसांनी जबरदस्तीनं दवाखान्यात नेलं, असा आरोपही त्यांनी केला.

शिवसेनेतल्या या बंडामुळे माहविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचं स्पष्ट केलं. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काल काँग्रेस आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्राचे निरीक्षक कमलनाथ यांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा कायम असल्याचं सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे यांच्या पाठीशी असून, सरकार समोर संकट असलं तरी यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु ठेवा, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *