Japan tour very worthwhile and useful: PM Narendra Modi
जपान दौरा अतिशय सार्थ आणि उपयुक्त: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
जपान दौरा अतिशय सार्थ आणि उपयुक्त ठरल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीला रवाना,
भारत-प्रशांत द्वीप सहकार्य परिषदेत होणार सहभागी
हिरोशिमा : जपानमध्ये हिरोशिमा इथं आयोजित जी सेव्हन शिखर परिषदेच्या निमित्तानं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. उभय नेत्यांनी यावेळी भारत आणि ब्रिटनमधील धोरणात्मक भागीदारीचा आणि दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि दोन्ही देशांमधील लोकांचे परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रात सहकार्य आणखी वाढवण्यावर सहमती दर्शवण्यात आली.
जी -सेव्हन शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा यांच्याशीही फलदायी चर्चा केली. भारत आणि ब्राझील या उभय देशांमधील व्यापार संबंध आणखी सुधारण्यासाठी दोन्ही देश एकत्र मिळून कार्यरत राहतील, असं एका ट्विट संदेशात नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी कृषी आणि संरक्षण यासह विविध क्षेत्रात परस्पर सहकार्यावर देखील चर्चा केली.
जपानमधील हिरोशिमा येथे झालेल्या जी -सेव्हन शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगाच्या संकल्पनेवर आधारित कार्यकारी सत्र – 8 मध्ये भाग घेतला. आपला जपान दौरा अतिशय सार्थ आणि उपयुक्त ठरल्याचं मोदी यांनी ट्विटरवरून सांगितलं. .
जी -सेव्हन शिखर परिषदेत जागतिक नेत्यांच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर विधायक चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. त्यांनी जपान सरकार, प्रधानमंत्री फुमियो किशिदा आणि स्थानिक लोकांचे त्यांच्या स्वागतासाठी आभार मानले. यापूर्वी आज सकाळी नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा इथल्या शांतता स्मृती संग्रहालयाला भेट दिली आणि तिथं प्रदर्शनात मांडण्यात आलेले दस्तऐवज पाहिले. तसंच अभ्यागत अभिप्राय पुस्तिकेत संदेश लिहिला. सर्व नेत्यांनी हिरोशिमा शांतता स्मृती संग्रहालयात श्रद्धांजली वाहिली.
तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीला रवाना झाले. मोदी आज पापुआ न्यू गिनी इथं भारत-प्रशांत बेटं सहकार्य परिषदेत सहभागी होणार आहेत. उद्या प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये जाणार असून, तिथं ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com