Jitendra Awad’s crime of indecent assault is a conspiracy – Ajit Pawar
जितेंद्र आव्हाड त्यांच्या विरोधात विनय भंगाचा गुन्हा हे षडयंत्र – अजित पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर् केला. आव्हाड यांच्या विरोधात एका महिलेनं विनय भंगाची तक्रार दाखल केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी व्यथित होऊन राजीनामा दिल्याचं जयंत पाटील यांनी आज ठाण्यात बातमीदारांना सांगितलं. राज्यात हीन पातळीवरचं राजकारण सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करायला हवा, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आव्हाड यांच्या बरोबर असून, त्यांनी राजीनामा देऊ नये अशी पक्षाची भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आजपर्यंत कधीही न केलेल्या कृत्यासाठी आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, आपल्या कुटुंबाला समाजाच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे व्यथित होऊन आपण राजीनामा देत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
आव्हाड यांच्या विरोधात काल रात्री उशिरा मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक उड्डाण पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्यावेळी आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार भाजपाच्या एका पदाधिकारी महिलेनं केली आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा परिसरात निदर्शनं केली. तर, नाशिकमधे युवक राष्ट्रवादी काँग्रेसनं मूक आंदोलन केलं.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विनयभंगाचा कोणताही प्रकार झालेला नसून, त्यांच्या विरोधात हे षडयंत्र असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या संदर्भातली चित्रफित वायरल झाली आहे. यात हा विनयभंग नसल्याचं स्पष्ट होतंय, असं ते म्हणाले. राज्यात बेरोजगारी, महागाई सारख्या अनेक भीषण समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांच्यापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असली षडयंत्रं रचली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com