Justice Dhananjay Chandrachud took oath as the 50th Chief Justice of the country
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली
देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना शपथ दिली. हा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन इथं झाला. काल सेवानिवृत्त झालेले सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची जागा ते घेतील.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं पूर्ण नाव धनंजय यशवंत चंद्रचूड आहे. त्यांचा जन्म १९५९ मध्ये पुण्यात झाला. धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल व जॉन कॅनन स्कूलमध्ये आणि नवी दिल्लीत सेंट कोलंबा स्कूलमध्ये झाले.
दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र व गणितात प्रथम क्रमांकाने पदवी संपादन केल्यावर त्यांनी तेथूनच एल्एल.बी. आणि हार्वर्ड विद्यापीठातून एल्एल.एम. प्राप्त केली. त्यानंतर हार्वर्डमधून जोसेफ बेले पारितोषिकासह न्यायशास्त्र (ज्युरिडिकल सायन्स) विषयात डॉक्टरेटही मिळविली.
चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी वकिली केली. जून १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली. १९९८ ते २००० या काळात धनंजय चंद्रचूड यांनी अॅडिशनल सॉलिसीटर जनरल म्हणून काम केलं. मार्च २००० मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र ज्युडिशीयल अकॅडमचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं.
१३ मे २०१६ पासून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड यांनीही दीर्घकाळ भारताचं सरन्यायाधीशपद भूषवलं होतं.
शपथविधी समारंभानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या आपल्या पहिल्या वक्तव्यात न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, सामान्य नागरिकांची सेवा करणे हे त्यांचे प्राधान्य आहे. रजिस्ट्री आणि न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणांसाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शपथविधी समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अमित शाह, राजनाथ सिंह आणि किरेन रिजिजू यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.
भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com