निवडणूक प्रशासन आणि तरुणांकडून मतदानाचे आवाहन

सार्वत्रिक निवडणूका Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Voting appeal from the election administration and the youth

निवडणूक प्रशासन आणि तरुणांकडून मतदानाचे आवाहन

मतदार जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजनसार्वत्रिक निवडणूका Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीच्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. मतदारसंघातील विविध भागात भेट देऊन मतदार राजाला मतदानाचे आवाहन करण्यात आले.

यावेळी निवडणूक निरीक्षक निरज सेमवाल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी अजय पवार, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे संस्थापक पराग मते, मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी उपस्थित होते.

लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक मतदानावर भर दिला आहे. २६ फेब्रुवारी रोजी मतदारांनी मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपला सहभाग द्यावा आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी केले.

लोकशाहीच्या उत्सवात तरुणाईचा सहभाग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने आणि स.प. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृती उपक्रमात सहभाग घेतला ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’,‘माझे मत माझा अधिकार’, ‘आमिषाला बळी पडणार नाही, मतदानापासून वंचित राहणार नाही’, ‘ लोकशाहीची शान- मतदान’, ‘आहे हे पुणे, मतदानाला पडू नका उणे’ अशा घोषणा देत नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातूनही निर्भयपणे मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांना सहभागी करून घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.

दिव्यांग मतदारांशी संवाद आश्वासक

मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी यावेळी रॅलीत सहभागी दिव्यांग मतदारांशीदेखील संवाद साधला. आपण मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा हा निर्धार आश्वासक आणि इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे श्री.देशपांडे म्हणाले. दिव्यांग विद्यार्थींनींनी गायिलेल्या गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. चार्ली चॅप्लिनच्या वेषातील वरप्रभ शिरगावकर हेदेखील मतदारांची भेट घेऊन मतदानासाठी आवाहन करीत होते.

जुन्या वाड्यातील मतदारांशी संवाद

मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे आणि जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यांना भेट देऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. प्रशासनाने मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा केली असून नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा. मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मतदारांना मतदार मार्गदर्शिकेचे वाटपही करण्यात आले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *