Lecture in University on ‘Kirana Gharana – Traditions and Streams’
‘ किराणा घराणे – परंपरा आणि प्रवाह ‘ या विषयावर विद्यापीठात व्याख्यान
ललित कला केंद्राच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन
भीमसेन जोशी अध्यासानाच्या स्थापना दिवसानिमित्त डॉ. अतिंद्र सरवडीकर यांचे सप्रयोग व्याख्यान
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भीमसेन जोशी अध्यासानाच्या २४ व्या स्थापना दिवसानिमित्त ‘किराणा घराणे – परंपरा आणि प्रवाह ‘ या विषयावर किराना घराण्याचे अभ्यासक व मुंबई विद्यापीठातील संगीत विषयातील प्राध्यापक डॉ.अतिंद्र सरवडीकर यांच्या व्याख्यानाचे २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजन केले होते.
ललित कला केंद्राच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्राचे प्रमुख डॉ.प्रवीण भोळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर प्रा.डॉ.केशव चैतन्य कुंटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
अध्यासनाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने संगीतविषयक शैक्षणिक आणि संशोधनात्मक उपक्रम घेण्याचा आमचा मानस असतो, म्हणून या सप्रयोग व्याख्यानाचे आयोजन केले असल्याचे डॉ.भोळे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सरवडीकर म्हणाले, संगीतातील एखादे घराणे म्हणजे काय तर ‘गायकीतील सर्व घटकांना निश्चित असे स्थान जिथे असते आणि बंदिश, आलाप आदींबाबत स्थापित दृष्टिकोन असतो’अशी व्याख्या मी तरी मानतो.
भारतात ग्वाल्हेर, आग्रा, किराणा आणि जयपूर अशी चार घरणी आहेत. त्यातील किराणा घराण्याचे अस्तित्व हे अब्दुल करीम खाँ साहेब यांच्यापासून सुरू झाले असे मानले तरीही याही आधीपासून सुरू झाली असल्याचे दाखले यावेळी डॉ. सरवडीकर यांनी दिले.
यावेळी त्यांनी काही दुर्मिळ ध्वनिफीतही ऐकवल्या. तसेच अब्दुल करीम खाँ साहेब यांच्या आवाजाची वैशिष्ट्ये, त्यांनी गायलेले रागाचे प्रकार याबाबत माहिती सांगितली. तसेच त्यानंतर घराण्यातील पुढील गायक आणि त्यांनी माहिती सांगताना घराणे कश्या पद्धतीने प्रवाही होते याचेही त्यांनी यावेळी दाखले दिले.
या व्याख्यानादरम्यान त्यांनी सांगीतिक सादरीकरणही केले. त्यांना सोहम ताटे यांनी हार्मोनियमवर तर ताराशीष बक्षी यांनी तबल्यावर साथ सांगत केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com