Mazagon Dock Shipbuilders Ltd launches third Stealth Frigate of Project 17A ‘TARAGIRI’
प्रकल्प 17 ए मधील ‘तारागिरी’ या तिसऱ्या युद्धनौकेचे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कडून जलावतरण
प्रकल्प 17 ए साठी एकूण खर्च 25,700 कोटी रुपये असून अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स, अत्याधुनिक कृती माहिती प्रणालीने होणार सुसज्ज
मुंबई : प्रकल्प 17 ए मधील तिसरी युद्धनौका ‘तारागिरी’ चे आज माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने जलावतरण केले. या युद्धनौकेसाठी एकात्मिक बांधणी पद्धत वापरण्यात आली आहे. या पद्धतीमध्ये विविध भौगोलिक ठिकाणी नौकेच्या प्रमुख भागाचे (हुल ब्लॉक्स) बांधकाम करण्यात येऊन एमडीएल येथे त्याचे एकत्रीकरण किंवा बसवण्याचे काम केले जाते.
तारागिरीची पायाभरणी 10 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आली होती आणि ऑगस्ट 2025 पर्यंत ती नौदलाकडे सुपूर्द होणे अपेक्षित आहे. या युद्धनौकेचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाइन ब्युरो या आरेखन संस्थेने केले आहे. युद्धनौका पर्यवेक्षण पथकाच्या (मुंबई) देखरेखीखाली एमडीएल विस्तृत आरेखन आणि बांधणी करत आहे.
प्रकल्प 17 अंतर्गत पहिली युद्धनौका ‘निलगिरी’चे जलावतरण 28 सप्टेंबर 2019 रोजी झाले होते आणि 2024 च्या पहिल्या सहामाहीत तिच्या सागरी चाचण्या होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प 17 ए एकूण 25,700 कोटी रुपये खर्चाचा आहे.प्रकल्प 17 अंतर्गत दुसरी युद्धनौका ‘उदयगिरी’चे जलावतरण 17 मे 2022 रोजी झाले होते आणि 2024 च्या दुसऱ्या सहामाहीत तिच्या सागरी चाचण्या होण्याची अपेक्षा आहे. 28 जून 2022 रोजी चौथ्या आणि अंतिम जहाजाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.
149.02 मीटर लांब आणि 17.8 मीटर रुंद असलेली ही युद्धनौका ,दोन गॅस टर्बाइन्स आणि 02 मुख्य डिझेल इंजिनांच्या सीओडीओजी संयोजनाद्वारे चालवली जात असून त्याचे आरेखन, सुमारे 6670 टन वजन घेऊन स्थानांतर करताना 28 नॉट्सपेक्षा जास्त वेग प्राप्त करण्याच्या दृष्टीने केलेले आहे.
प्रकल्प 17ए अंतर्गत युद्धनौकेच्या मुख्य भागाच्या बांधणीत वापरलेले पोलाद हे स्वदेशी विकसित डीएमआर 249 ए असून ते भारतीय पोलाद प्राधिकरणाने (SAIL) उत्पादित केलेले लो कार्बन मायक्रो अलॉय ग्रेड पोलाद आहे. स्वदेशी बनावटीच्या या स्टेल्थ युद्धनौकेमध्ये अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स, अत्याधुनिक कृती माहिती प्रणाली, एकात्मिक मंच व्यवस्थापन प्रणाली, जागतिक दर्जाची मॉड्युलर लिव्हिंग स्पेस, अत्याधुनिक वीज वितरण प्रणाली आणि इतर अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये असतील.
या युद्धनौकेवर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी स्वनातीत क्षेपणास्त्र प्रणाली बसवली जाणार आहे. शत्रूच्या विमानांपासूनचा धोका परतवून लावणारी हवाई संरक्षण क्षमता या युद्धनौकेची राहील.जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे व्हर्टिकल लॉन्च जवळ असतील आणि लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीने युद्धनौका सज्ज राहील.
दोन 30 मिमी रॅपिड फायर गन युद्धनौकेला सर्व बाजूनी संरक्षण क्षमता प्रदान करतील तर एक एसआरजीएम गन युद्धनौकेत नौदलाच्या प्रभावी भडिमाराला पाठबळ देईल. स्वदेशी बनावटीचे ट्रिपल ट्यूब वजनाला हलके पाणतीर लाँचर्स आणि रॉकेट लाँचर्स युद्धनौकेच्या पाणबुडीविरोधी क्षमतेत भर घालतील.
या समारंभाचे प्रमुख अतिथी व्हाइस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांच्या पत्नी श्रीमती चारू सिंग यांच्या हस्ते या जहाजाचे नामकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला, व्हाइस ऍडमिरल नारायण प्रसाद, एव्हीएसएम, एनएम, आयएन (निवृत्त), माझगाव डॉक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हाइस ऍडमिरल के एम देशमुख एव्हीएसएम, व्हीएसएम, सी डब्लू पी अँड ए आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेचे पालन करून 11 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय दुखावटा जाहीर केल्याने हा कार्यक्रम केवळ तांत्रिक प्रक्षेपणापुरता मर्यादित होता. कार्यक्रम समुद्राच्या भरतीवर अवलंबून असल्याने वेळापत्रकात कोणताही बदल करणे शक्य नव्हते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com