Liquor shops in Pune to remain closed for three days during Ganpati Festival
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद
पुणे : गणेशोत्सव कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती ३१ ऑगस्ट,९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर दिवशी बंद राहतील.
तसेच गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ मधील नियम – १४२ अन्वये किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती (एफएल-२, एफएल-३, सीएल-३, एफएलबीआर-२, फॉर्म-ई, फॉर्म-ई-२ वट. ड. -१) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
३१ ऑगस्ट संपुर्ण दिवस पुर्ण पुणे जिल्हा, ९ सप्टेंबर संपुर्ण दिवस पुर्ण पुणे जिल्हा,१० सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती तसेच गणेशोत्सवाचा पाचवा व सातवा संपूर्ण दिवस ज्या भागात पाचव्या व सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते अशा भागातील अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात.
याशिवाय ज्या-ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असेल, त्या-त्या ठिकाणी विसर्जन मिरवणुक मार्गावरील सर्व भागातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद ठेवाव्यात.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ व त्याअंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com