State government’s loan waiver of Bhuvikas Bank is fraudulent – Sharad Pawar
राज्य सरकारनं केलेली भूविकास बँकेची कर्जमाफी फसवी – शरद पवार
पुणे : गेल्या २५- ३० वर्षांपासून कार्यरत नसलेल्या भूविकास बँकेची राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यात पुरंदर आणि सासवड भागात आज त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता.
परतीच्या पावसामुळे राज्यातील दीड लाख हेक्टवरील पिके मातीमोल झाली. त्यामुळे शेतीवर मोठं संकट उभ राहिले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार आहे. एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची ही कर्जमाफी असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
गेल्या १० वर्षांत कुणाला भूविकास बॅंकेचं कर्ज मिळालेलं नाही, त्यापूर्वी कधीतरी घेतलेल्या कर्जाची वसुली आता होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन सरकारने कर्ज माफ केल्याचं जाहीर केलं, असं पवार म्हणाले.
देशाची आणि राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे, अशी दोन्ही सरकारं ग्रामीण भागातल्या माणसांसाठी काहीही करीत नाहीत, अशी टीका पवार यांनी केली.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. मात्र भूजल पातळी दोन वर्षांसाठी वाढणार आहे, ही बाब लक्षात घेऊन आजच नियोजन करण्याची गरज असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com