It is unfortunate that local body elections are held without OBC reservation – Devendra Fadnavis
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे दुर्देवी – देवेंद्र फडणवीस
मुंबई : इतर मागास प्रवर्ग – ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणं, हे दुर्देवी असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित केलेल्या भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्ष यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा तिढा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘काहीही झालं तरी भाजप ओबीसींना आरक्षण देणारच’, अशी गर्जना केली आहे.
महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या आरक्षण विरोधात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा खून केला. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिल्यांदा ट्रिपल टेस्ट अर्थात, तिहेरी चाचणीचा मुद्दा आला. त्यावेळीही या सरकारनं वेळकाढू धोरण अवलंबत वारंवार न्यायालयात तारखा मागण्याचं काम केल्याचं त्यांनी सांगितलं.
ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात इम्पेरिकल डेटा जमा करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगतिलं होतं. परंतु त्यातही सरकारनं चालढकल केल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. आरक्षण असो वा नसो यापुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप २७ टक्के जागा ओबीसींनाच देणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.