Maharashtra is the mainstay of the country’s economy – CM Uddhav Thackeray
महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वडाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन
मुंबई : वस्तू आणि सेवा कर विभाग हा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या एकूण उत्पन्नात सर्वाधिक योगदान देणारे महाराष्ट्र राज्य हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वडाळा येथे वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आजच्या वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार तसेच विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे असून त्यांच्या पाठपुराव्यामुळेच सगळ्या परवानग्या मिळवून आज त्याचे काम सुरु होत आहे. कर संकलनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची बाब अभिमानास्पद आहे. आज भूमिपूजन होत असलेली वास्तू पर्यावरणपूरक असून ती २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होईल असेही श्री ठाकरे म्हणाले.
जीएसटी करसंकलनात महाराष्ट्र अव्वल– उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, श्री. अजित पवार म्हणाले, कोरोनाविरुद्धची लढाई निश्चितच सोपी नव्हती. कोरोना संकटाशी राज्यातील सर्वजण ज्या एकजुटीने, निर्धाराने लढले, त्याची नोंद इतिहासात निश्चितच होईल.
या लढाईला आर्थिक पाठबळ देण्याचे, फार मोठे आणि महत्वाचे काम, वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले. राज्य कर विभागाने, जीएसटी विभागाने, करसंकलनातून दिलेल्या आर्थिक पाठबळामुळेच कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी होऊ शकली. करआकारणीत संतुलन साधण्याचा, त्यातून कर उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात, राज्याची अर्थव्यवस्था 1 कोटी ट्रिलीयन डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दीष्टं ठेवले आहे असे श्री पवार म्हणाले.
कोरोनाकाळात अडचणीत आलेल्या, राज्यातल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – 2022’ ही अभय योजना लागू केली आहे. या अभय योजनेच्या माध्यमातून, कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास, थकबाकीची ती रक्कम पूर्णपणे माफ केली आहे. छोट्या व्यापाऱ्यांना सुमारे 1 लाख प्रकरणांमध्ये हा लाभ मिळणार आहे. उद्योग, व्यापार क्षेत्रातल्या बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.
नवीन जीएसटी भवन वैशिष्ट्यपूर्ण
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, राज्यातील प्रत्येक कार्यालय लोकाभिमुख झालं पाहिजे. राज्य शासनाच्या सर्वच विभागांची कार्यालये स्वत:च्या जागेत असली पाहिजेत, कार्यालयांच्या इमारती स्वच्छ, सुंदर, आकर्षक असल्या पाहिजेत यावर भर देण्यात येत आहे.
राज्याला कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात राज्य कर विभागाचा वाटा जवळपास 65 टक्के आहे. मुंबईतील वडाळा या मध्यवर्ती ठिकाणी, नवीन जीएसटी भवनाचे भूमीपूजन होत आहे. जीएसटी हा राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग आहे.
आयुक्त राजीव कुमार मित्तल यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष श्री. राधेश्याम मोपलवार यांनी केले.
नियोजित नवीन जीएसटी भवन इमारत २२ मजल्यांची असून , या इमारतीमध्ये एकाच वेळी ८००० पेक्षा अधिक कर्मचारी काम करू शकतील व १६०० पेक्षा अधिक लोक एकाच वेळी कार्यालयास भेट देऊ शकतील. या व्यतिरिक्त, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची इतर काही कार्यालये व निवासी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच अधिकारी-कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण केंद्रही येथे असणार आहे.
Hadapsar News Bureau