Maharashtra Startup and Innovation Yatra was inaugurated by Divisional Commissioner Saurabh Rao
महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने काढण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आला.
विधानभवन येथे दोन फिरत्या एलईडी डीस्प्ले व्हॅनला झेंडा दाखवून श्री. राव यांनी स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा उंटवाल-लोढा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे आदी उपस्थित होते.
डिस्प्ले व्हॅनद्वारे तालुकास्तरीय जनजागृती
महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण, यात्रेबाबतची संपूर्ण माहिती व उद्देश, नाविन्यपूर्ण संकल्पना व त्यांचे पैलू तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या एलईडी डिस्प्ले व्हॅनवरुन प्रदर्शित केली जाणार आहे. स्टार्टअप यात्रा १७ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यात दाखल होत असून याअंतर्गत डिस्प्ले व्हॅनच्या माध्यमातून ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रचार, प्रसिद्धी होणार आहे. यावेळी नाविन्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना नोंदवू शकतील.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण व सादरीकरण स्पर्धा
तालुकास्तरीय प्रसिद्धीनंतर जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी पहिल्या सत्रामध्ये विभागाच्या विविध योजनांची माहिती, स्टार्टअपच्या प्रवासातील टप्पे याबाबत मार्गदर्शन व स्थानिक उद्योजकांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. दुसऱ्या सत्रात सत्रात १६ सप्टेंबर रोजी सादरीकरण स्पर्धा घेण्यात येणार असून प्रत्येक सहभागीस सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे.
सादरीकरण स्पर्धेतील उत्कृष्ट नवकल्पनांना पारितोषिके
उत्कृष्ट नवकल्पनांच्या सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हास्तरावर पहिल्या क्रमांकाचे २५ हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाचे १५ हजार रुपये तर तिसऱ्या क्रमांकाला १० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. विभागस्तरावरील सर्वोत्कृष्ट उद्योजकाला विभागाचा स्टार्टअप हिरो म्हणून आणि विभागीय सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिकेला प्रत्येकी १ लाख रुपयांचे रोख बक्षिस मिळेल.
जिल्हास्तरीय सादरीकरणातून उत्तम १० कल्पनांचे राज्यस्तरावर सादरीकरण होणार असून त्यातून निवडलेल्या राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच आवश्यक आर्थिक व अन्य पाठबळ पुरवण्यात येईल.
या यात्रेच्या शुभारंभप्रसंगी औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. आर. शिंपले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहायक संचालक चंद्रशेखर ढेकणे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सा. बा. मोहिते, ह. श्री. नलावडे तसेच विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com