Maharashtra wins the opener in Kabaddi in Khelo India. Andhra Pradesh lost by 19 points
महाराष्ट्राची खेलो इंडियात कबड्डीत विजयी सलामी आंध्र प्रदेशचा १९ गुणांनी दणदणीत पराभव
मुलांनंतर मुलींनी विजयी पतका फडकावत महाराष्ट्राचे नाव उंचावले.
हरियाणा : चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या महाराष्ट्राचा मुलांच्या कबड्डी संघाने आंध्र प्रदेशला धूळ चारली. तब्बल १९ गुणांनी हरियाणाच्या भूमीत विजयी सलामी देत आपले कौशल्य दाखवले. महाराष्ट्राने तब्बल ४८ गुण घेतले तर आंध्र प्रदेशला २९ गुणांपर्यंतच मजल मारता आली.
ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉप्लेक्समध्ये हा सामना झाला. सुरूवातीला अटीतटीचा वाटणारा सामना महाराष्ट्राने एकतर्फी केला.
महाराष्ट्राने पहिल्याच चढाईत एक गुण घेतला. डु ओर डाय रेडमध्येही गुण मिळवला. सुरूवातीपासूनच महाराष्ट्राने आक्रमक खेळ केला. परंतु नंतर आध्र प्रदेशने आक्रमकता वाढवून सामन्यात पुनरागमन केले. चार विरूद्ध पाच गुणांची आघाडी घेतली. त्यांनी चारगुणांची कमाई करीत महाराष्ट्राला ऑल आऊट केले. त्यामुळे सामना बारा विरूद्ध सहा असा फिरला.
परंतु नंतर महाराष्ट्राचे खेळाडू आक्रमक झाले. आंध्र प्रदेशला ऑलआऊट केले. त्यामुळे त्यांचे पंधराविरूद्ध सोळा गुण झाले. अठराव्या मिनिटाला सतरा आणि सतरा अशी बरोबरी झाली. परंतु पहिल्या हाफमध्ये महाराष्ट्रने तीन गुणांची आघाडी घेतली. त्यावेळी गुणफलकावर २० विरूद्ध १७ असे गुण होते. दुसऱ्या हाफ मध्ये महाराष्ट्र आणखीच आक्रमक झाला. त्यांनी चढाई आणि बचावातही उजवा खेळ केला. त्यामुळे आठ मिनिटे बाकी असताना जवळपास दुप्पट गुण मिळवले. धावफलक ४० विरूद्ध असा होता. शेवटी महाराष्ट्राने ४८ गुण मिळवत पहिलावहिला खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये विजय नोंदवला. आंध्र प्रदेशचे २९ गुण होते.
शिवम पठारे (अहमदनगर), पृथ्वीराज चव्हाण (कोल्हापूर) यांनी चढाईत नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांच्या बळावरच महाराष्ट्राला गुण मिळवता आले. दादासाहेब पुजारी, रोहन तुपारे, साईप्रसाद पाटील, जयेश महाजन यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. त्यामुळे संघाला भरभक्कम आघाडी घेता आली. सामन्यात आऊ आउट झाल्याने महाराष्ट्र सहा गुणांनी पिछाडीवर होता. परंतु नंतर आक्रमक खेळ करीत मुलांनी सफाईदार खेळ केला.
आंध्र प्रदेशचा खेळाडू बेशुद्ध
आंध्र प्रदेशने एका चढाईत तब्बल चार गुण मिळवले. परंतु महाराष्ट्राने लगेच एक सुपर टॅकल करीत गुणसंख्या ४५ पर्यंत नेली. त्यावेळी आंध्र प्रदेशचे २७ गुण होते. त्यावेळी झालेल्या धरपकडीत आंध्र प्रदेशचा चढाईपटू जखमी झाला. त्याला मैदानातून स्ट्रेचर आणून बाहेर न्यावे लागले. त्यामुळे सामन्यात तणाव निर्माण झाला होता. परंतु महाराष्ट्राने चढाई आणि बचावातही नेत्रदीपक खेळ कायम ठेवला.
कबड्डीत झारखंडचा ४५ गुणांनी उडवला धुव्वा
चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्याच दिवशी कबड्डीत मुलांनंतर मुलींनी विजयी पतका फडकावत महाराष्ट्राचे नाव उंचावले. मुलींनी नेत्रदीपक कामगिरी करीत तब्बल ४५ गुणांनी झारखंडचा धुव्वा उडवला. ६० विरूद्ध १५ असा हा सामना झाला.
पंचकुलातील ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये हा सामना रंगला. सामन्यात पहिल्या पाचच मिनिटांत मुलींनी झारखंडवर पाच-शून्य अशी गुणांची आघाडी घेत मानसिक दबाव टाकला. त्यामुळे झारखंडला सामन्यात कमबॅक करता आले नाही.
खेळाडूंनी प्रारंभीच सामना महाराष्ट्राच्या बाजूने झुकवला होता. पहिल्या हापमध्ये १५ गुणांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या हापची दहा मिनिटे उरली असताना महाराष्ट्राच्या मुलींनी तब्बल ४५ गुण फलकावर लावले. त्यावेळी झारखंडचे अवघे १३ गुण होते. त्यामुळे केवळ सामन्याची औपचारिकता उरली होती. सामन्याला एक मिनिट उरला असताना पुन्हा एकदा झारखंडला ऑल आऊट केले. त्यामुळे गुणफलकावर लागले ६० गुण. झारखंडचे होते अवघे १५ गुण.
प्रशिक्षक गीता साखरे-कांबळे, सोनाली जाधव यांनी तर टीम व्यवस्थापक अनिल सातव, महेश खर्डेकर, ज्ञानेश्वर खुरांगे, सपोर्ट स्टाफ विजय खोकले, किशोर बोंडे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला. या सर्वांनी ठरवलेल्या प्लॅननुसार खेळाडूंनी सामन्यात कौशल्य दाखवले.
हडपसर न्युज ब्युरो