Former Minister of State for Home Manikrao Gavit passed away
माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचं निधन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांना श्रद्धांजली
नवापूर : माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचं वृद्धापकाळानं आज निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. २९ ऑक्टोबर १९३४ ला नवापूर तालुक्यातील धुळीपाडा इथं जन्मलेल्या माणिकराव गावित यांनी संसदेत नऊ वेळा खासदर पद भुषविल असून ते काहीकाळ देशाचे गृहमंत्री होते.
माणिकराव गावित यांच्यावर उद्या नवापूर इथं अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांच्या पाठीमागे मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार ,तर पुत्र भरत गावित भाजपा चे जिल्हा परिषद सदस्य आहेत.
१९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य तर धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातुन ते सदस्य म्हणून निवडून आले होते. १९७१ ते १९७८ दरम्यान ते धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती होते. १९८० साली नवापूरचे आमदार झाले, आणि १९८१ साली खासदार झाले.
त्यांनी पेट्रोलियम आणि केमिकल व नैसर्गीक वायु या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून तर १९९८-९९ या काळात लेबर अॅण्ड वेल्फेअर मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांना श्रद्धांजली
आदिवासी, ग्रामीण भागाचा सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून देशभर लौकिक असलेले प्रगल्भ असे मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘ज्येष्ठ नेते गावित यांचा ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री ही वाटचाल त्यांच्या नेतृत्वाविषयी खूप काही सांगून जाते. त्यांनी निवडणुकीतील मताधिक्याने आपल्या लोकप्रियतेची ओळख करून दिली.
आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो त्या आदिवासी, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्यासाठीच्या विकास प्रकल्प, योजना यासाठी ते हिरीरीने प्रयत्नशील असत. त्यांच्या सारखे मार्गदर्शक नेतृत्व गमावणे हे राजकीय क्षेत्राची हानी आहे. ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांना भावपूर्ण श्रद्धांजली’
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गावित यांना श्रद्धांजली वाहिली आहे
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com