मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य

Chandrakant Patil. BJP State President

Support for Marathi-speaking youth in various fields’

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य

-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : मराठी भाषिक युवकांनी विविध क्षेत्रात पुढे जावे यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

Chandrakant Patil. BJP State President
File Photo

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, गोव्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री गोविंद गावडे, संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी आमदार रामदास फुटाणे, डॉ.पी.डी.पाटील, गिरीष गांधी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या सेवेत मराठी माणसाचे प्रमाण कमी आहे. मराठी टक्का वाढविण्यासाठी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र शासन स्तरावर असे प्रयत्न होत असताना युवकांनी इतर क्षेत्रातील संधींचाही विचार करावा.

राज्यातील बहुतांशी विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय सेवेला प्राधान्य देतात, ते उद्योग-व्यवसायाकडे फारसे वळत नाहीत. चांगली संधी असताना मराठी तरुण राज्याबाहेर जायला तयार होत नाही. सर्व क्षेत्रात मराठी टक्का वाढवायचा असल्यास नव्या पिढीत धाडस निर्माण करावे लागेल. मराठी माणूस जगात पुढे जायचा असेल तर तशी मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री.मुनगंटीवार म्हणाले, मन-बुद्धीला समृद्ध करणारी आणि हृदयात आनंद निर्माण करणारी मराठी भाषा इतरांना आनंद देणारी कशी होईल याचे चिंतन करण्याची गरज आहे. जगातील बोलल्या जाणाऱ्या भाषेपैकी आपली भाषा दहाव्या क्रमांकावर आहे. मराठी ही ऐतिहसिक वारसा सांगणारी, अध्यात्म विचार आणि साहित्यिक वैभव असलेली भाषा आहे. आपण जगातील १९३ देशापैकी सांस्कृतिक वारशात पहिल्या १० मध्ये आहोत. मराठीला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून चार दिवसाच्या चिंतनातून मराठी पुढे नेण्यासाठी विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, संत वाङ्मायाने मराठी भाषेला समृद्धी दिली. पर्यावरणावर प्रेम करणारी, सृष्टीचे महत्व जाणणारी, परमेश्वरी चिंतनात रमणारी, कर्तव्यपूर्तीसाठी पराक्रमाची गाथा सांगणारी, उत्तम प्रपंच करण्याचा संदेश देणारी, इंग्रजांना स्वराज्याच्या घोषणेने घाम फोडणारी मराठी भाषा आहे. उत्तम व्यवहाराचा मंत्रही मराठीने दिला आहे. मराठीची ऊर्जा आणि शक्ती विश्वकल्याणासाठी उपयोगात यावी, असा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न आहे.

मराठी ज्ञानाची भाषा व्हावी असा प्रयत्न आहे. जगात हजारो भाषा संपुष्टात आल्या आहेत. मराठी ज्ञान विज्ञान, शास्त्र, व्यापाराची भाषा व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. जगातले उत्तम ज्ञान मराठी भाषेत आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘मराठी पोर्टल’ लवकरात लवकर तयार करण्याचा प्रयत्न असून त्याद्वारे मराठी भाषेच्या विकासासाठी सूचना देता येईल. मराठी सर्वांना श्रेष्ठ करणारी भाषा व्हावी, सर्वांना आनंद देणारी भाषा व्हावी यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी ज्ञानेश्वर मुळे यांनीदेखील विचार व्यक्त केले. मंत्रीद्वयांच्या हस्ते संमेलन आयोजनासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *