Ambadas Danve alleges massive corruption in the Diwali gift scheme announced through ration card
शिधापत्रिकेच्या माध्यमातून जाहीर केलेल्या दिवाळी भेट योजनेत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप
मुंबई : सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या नावाखाली सरकारनं गोरगरीब जनतेला शिधापत्रिकेच्या माध्यमातून जाहीर केलेल्या दिवाळी भेट योजनेत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या पावणे २ कोटी कुटुंबांना अवघ्या १०० रुपयात फराळासाठी आवश्यक साहित्य देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश आहे.
अंबादास दानवे यांचा आरोप
मंत्रिमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्यानं हा घोटाळा उघडकीस आला असून, या दिवाळी भेट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
या भेटीसाठी एक रुपयाही न घेता ही भेट मोफत द्यावी, आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्यापूर्वी अत्यंत घाई-गडबडीनं आणि कमी वेळात, ५१३ कोटी २४ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया का पार पाडण्यात आली, कुणाच्या फायद्यासाठी हे केलं जात आहे, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
खुली स्पर्धा न घेता अवघ्या तीन दिवसांत मंत्रिमंडळ निर्णय होण्यापूर्वी ही निविदा काढण्यात आली असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com