The maximum temperature is likely to rise in various parts of the country in the coming days
येत्या काही दिवसांत देशाच्या विविध भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता
सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अकोला, बुलडाणा, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी पारा ४० अंशाच्या वर
अकोल्यात सर्वाधिक ४५ पूर्णांक ५ दशांश अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद
मुंबई : देशातील वातावरण सातत्यानं बदलत आहे. मोचा चक्रीवादळानेउन्हाचा चटका थोडा कमी झाला असला तरी पुढील काही दिवसात पारा चाळिशी ओलांडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कधी पाऊस तर कधी उन्हाचा कडाका यामुळे शेती पिकांसह नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
येत्या काही दिवसांत देशाच्या विविध भागातल्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. येत्या दोन ते तीन दिवसात पूर्व किनाऱ्यावर उष्णतेची लाटसदृश स्थिती राहील, असा अंदाज आहे.
महाराष्ट्रातल्या विदर्भात तुरळक ठिकाणी आज उष्णतेची लाट आहे. तर ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर येत्या दोन दिवसात उकाडा कमालीचा वाढण्याची शक्यता आहे. येत्या पाच दिवसात ईशान्येकडच्या राज्यांत पावसाची शक्यता आहे. राज्यात गेल्या २४ तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली.
विदर्भात तरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अकोला, बुलडाणा, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी पारा ४० अंशाच्या वर गेला आहे.
अकोल्यात सर्वाधिक ४५ पूर्णांक ५ दशांश अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अमरावतीतही ४५ पूर्णांक ४ दशांश , तर वर्ध्यात ४४ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
वाढतं उष्णतामान बघता या पार्श्वभूमीवर लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, त्यासाठी छत्री किंवा स्कार्फ वापरा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com