Melghat Tiger Reserve status of world standard
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा
अरण्यसमृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमरावती : जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे (जीटीएफ) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ‘कंझर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड’ (कॅटस्) या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता प्रकल्पाने केली असल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून, अरण्यसमृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सातपुड्याच्या पर्वतरांगांत वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. उंच समांतर पर्वतरांगा, उत्तुंग सागवृक्ष, मिश्र वनांचे पट्टे, धबधबे यांनी समृद्ध मेळघाटात गौर, सांबरसारख्या प्राण्यांपासून पक्षी, फुलपाखरे, कीटकांपर्यंत विपुल जैवविविधता आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान मिळण्याचा योग प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या, तसेच अमरावतीकरांच्या आनंदात भर घालणारा आहे.
व्याघ्र प्रकल्पाचे सामाजिक, सांस्कृतिक, जैविक महत्व, व्यवस्थापन नियोजन, स्थानिक समुदाय, पर्यटन, संरक्षण, अधिवास विकास, वाघांची संख्या अशा सात विषयांबाबत झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल प्रकल्पातर्फे टायगर फोरमकडे सादर करण्यात आला. फोरमच्या चमूने व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणी भेटी देऊन या कामांची पाहणी केली. निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी या चमूत सहभागी असतात. या चमूने प्रत्यक्ष कामे, व्यवस्थापनाचा दर्जा, संरक्षण दर्जा याची तपासणी करून अहवाल ग्लोबल फोरमला दिला. त्यानुसार फोरमकडून जागतिक मानक प्रकल्पाला जाहीर करण्यात आले आहे.
‘कॅटस्’नंतर ‘मॅनेजमेंट इफेक्टिव्ह इव्हॅल्यूशन’तर्फे विविध विषयांवर पाहणी केलेली असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सकारात्मक गुण प्राप्त करेल, असा विश्वास प्रकल्पाच्या संचालिका जयोती बॅनर्जी यांनी व्यक्त केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात संवर्धन व संरक्षण कार्यात अहोरात्र झटणा-या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य या कामासाठी मिळाले असून, या सर्वांचे अभिनंदन श्रीमती बॅनर्जी यांनी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com