The opposition demands that the Minister of Cultural Affairs should resign
सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी विरोधकांची मागणी
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेची जबाबदारी घेत, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी विरोधकांची मागणी
मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना, महाराष्ट्र भूषण सन्मानानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या ११ श्री सदस्यांचा उष्माघातानं मृत्यू झाला, तर २० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेत, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
दानवे यांनी आज खारघर इथल्या रुग्णालयांत दाखल रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना, सांस्कृतिक खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. या कार्यक्रमासाठी आलेल्या श्रीसेवकांना पाणी आणि सावलीसह आवश्यक सुविधा देणं ही आयोजकांची जबाबदारी होती, या सुविधा देणं शक्य नव्हतं, तर खुल्या मैदानावर कार्यक्रम घ्यायला नको होता, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. या आयोजनात योग्य ती खबरदारी घेतली होती की नाही, याची चौकशी व्हायला हवी, असं मत पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, हा कार्यक्रम कडाक्याच्या उन्हात न ठेवता सायंकाळी घेण्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली नाही का, असा प्रश्न विचारला आहे. एका ट्विट संदेशात ठाकरे यांनी, भविष्यात अशा घटना होऊ नयेत, आणि प्रशासन अशा चुका करणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com