The artisans of Miraj play a major role in the export of stringed instruments from the country
देशातून होणाऱ्या तंतुवाद्यांच्या निर्यातीत मिरजेतील कारागिरांचं मोठं योगदान
तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रविणा सुरबहार, यांसारख्या वाद्यांची निर्मितीचे मिरज शहर
सांगली : मिरज ही भारतीय तंतुवाद्यांची राजधानी मानली जाते. 1850 साली इथे पहिला तानपुरा बनला आणि तेव्हापासून अनेक घराणी गेल्या सहा-सात पिढ्या तानपुरा, सतार, वीणा, सारंगी ही भारतीय शास्त्रीय संगीतातली तंतुवाद्यं एका व्रतासारखी करत आहेत.
सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे दीडशे वर्षांहून अधिक काळ तंतूवाद्य निर्मितीसाठी प्रसिध्द आहे. इथले नामवंत कारागीर मजीद सतार मेकर यांना अलिकडेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील मागील मन की बात मध्ये अनेक देशांमधील भारतीय संगीताच्या लोकप्रियतेमुळं देशातून संगीत वाद्यांची निर्यात वाढल्याचा उल्लेख केला होता.
मिरजेमध्ये निर्मित तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रविणा सुरबहार, यांसारख्या वाद्यांना देशविदेशातीतल नामांकीत कलाकारांकडून मागणी असते. जगाच्या कानाकोपऱ्यात तानपुरे, सतार, सारंगी, वीणा, रुद्रवीणा, बुलबुल अशी असंख्य प्रकारची तंतुवाद्यं जातात. दिवसरात्र अखंड इथं ही वाद्यं घडवण्याचं काम सुरु असतं.
दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी लावलेल्या तंतूवाद्य निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. अनेक कारागिर यामध्ये कार्यरत आहेत.
तंतूवाद्य तयार करणाऱ्या कारागिरांची एक पेठच इथं वसली आहे. २५ हून अधिक दुकानांमधून १०० हून अधिक कारागीर हे काम करीत आहेत. तंतूवाद्य दुरुस्तीमध्ये देखील हे कारागीर इतके वाकबगार आहेत की पिढ्या न् पिढ्या वाजवली जाणारी वाद्यं दुरूस्ती आणि देखभालीसाठी कलाकार केवळ मिरजेच्या कारागिरांच्याच हाती विश्वासानं देतात.
फरीदसाहेब यांच्यानंतर तंतु वाद्य निर्मितीची ही परंपरा पीरसाहेब, हुसेन साहेब यांनी पुढे चालविली. हुसेनसाहेब यांचे पुत्र आबासाहेब वैविध्यपूर्ण तंतुवाद्ये बनवली. शाहमृगाच्या अंडय़ापासून बनविलेली सतार त्या काळात गाजली होती. दरबारी बिलोरी हंड्याचा वापर करूनही त्यांनी सतार बनवली होती. मोठ-मोठय़ा संगीत महोत्सवात मिरजेतील तंतुवाद्यांना कलाकार पहिली पसंती देतात. इथल्या तंतुवाद्यनिर्मितीची कीर्ती ऐकून मजिद सतारमेकर आणि त्यांचे पुत्र अतिक यांना जपान आणि फ्रान्समध्ये तंतुवाद्यनिर्मितीची कार्यशाळा घेण्यासाठी खास निमंत्रण देण्यात आलं होतं.
तंतुवाद्य निर्मितीचा व्यवसायिक अभ्यासक्रमही लवकरच तयार होणार आहे. तंतुवाद्याची गणना हस्तकलेमध्ये व्हावी, वृद्ध तंतुवाद्य कलाकारांना पेन्शन मिळावी, कारागिरांसाठी घरकूल, आरोग्य विमा योजना राबवाव्यात आणि हस्त कारागिरांप्रमाणेच शासकीय पुरस्कार मिळावेत अशा या कारागिरांच्या मागण्या आहेत. पण त्यावर अडून न बसता त्यांनी ही कला वर्षानुवर्ष टिकवून ठेवली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “तंतुवाद्यांच्या निर्यातीत मिरजेतील कारागिरांचं मोठं योगदान”