MLA Atul Bhatkhalkar’s demand to investigate NCP President Sharad Pawar in the patra chawal scam case
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी करण्याची आमदार अतुल भातखळकर यांची मागणी
मुंबई: मुंबईतील गोरेगाव भागातील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी व्हावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय-ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात, तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एका माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला आहे.
संबंधित मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आलं, त्यानंतर यामध्ये एक हजार चौतीस कोटी रुपयांचा घोटाळा झाला, आणि संजय राऊत हेच या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार होते, असा दावा ईडीनं आपल्या आरोपपत्रातून केला आहे. मात्र हे माजी मुख्यमंत्री कोण, याचा खुलासा ईडीनं केलेला नाही.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत हे या प्रकरणात फक्त एक चेहरा होते, प्रत्यक्षात सगळा गैरप्रकार संजय राऊत यांच्या नियंत्रणाखाली झाला, असं ईडीनं आपल्या आरोपपत्रात म्हटल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com