Modernization and self-reliance are the main objectives of the country – Prime Minister
आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भरता हीच देशाची मुख्य उद्दिष्ट्ये -प्रधानमंत्री
नवी दिल्ली: आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भरता हीच देशाची मुख्य उद्दिष्ट्यं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज उत्तराखंड इथल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीत ९६ व्या पायाभूत अभ्यासक्रम कार्यक्रमाच्या सांगता समारंभात दूरदृष्य प्रणालिच्या माध्यमातून बोलत होते.
१६ प्रशासकीय सेवांमधल्या ४८८ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना आणि रॉयल भुतानच्या पोलीस आणि वनसेवा मधल्या अधिकाऱ्यांना त्यांनी संबोधीत केलं. सर्व जगाचं लक्ष्य भारताकडे लागलं आहे. कारण कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जागतिक परिप्रेक्ष्य बदललं आहे. त्यामुळे भारतानं वेगानं पुढे जाणं काळाची गरज बनली आहे, असंही ते म्हणाले.
व्यवस्था बदलण्याआधी त्या व्यवस्थेच्या मुळाशी जाऊन त्या व्यवस्थेच्या मागची कारणं जाणून घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्मयोगी मोहिमेंतर्गत समर्पणभाव प्रत्येक अधिकाऱ्यांनी अंगिकारायला हवा. अधिकाऱ्यांनं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ फाईलींमध्ये अडकून न पडता वेळेवेर रस्त्यावरही उतरावं, असा सल्ला या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मोदी यांनी दिला.
प्रत्येक समस्येच्या मुळाशी गेलं तरच त्या समस्येचं समाधान प्राप्त होईल. त्यासाठी लक्ष केंद्रीत करा विचलीत होऊ नका, असंही ते म्हणाले. आज याच समर्पण भावनेमुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक सामान्य नागरिक आपल्या हक्काच्या घरात राहणार आहे. पुढील २५ वर्षात देशाच्या विकासात अधिकाऱ्यांच्या या तुकडीची महत्त्वाची भूमिका असेल, असंही ते म्हणाले.