Monsoon Session of State Legislature begins
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी आधिवेशनाला प्रारंभ
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडल्या. यावर २२ आणि २३ ऑगस्ट रोजी चर्चा होऊन मतदान होईल असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनियुक्त मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून दिली. त्यानंतर सर्व स्थगन प्रस्ताव फेटाळल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. यानंतर काँग्रेसकडून नाना पटोले यांनी पूर स्थितीवर चर्चेची मागणी केली. विरोधी पक्षाच्या उद्याच्या प्रस्तावात याचा समावेश करण्याची सूचना अध्यक्षांनी त्यांना केली.
राज्यातल्या पूरस्थितीवर राज्य सरकारचं पूर्ण लक्ष असून लवकरच त्यावर विस्तृत निवेदन देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला.
देशाने नेहमीच महिला सबलीकरणात पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. मुर्मू यांच्या निवडीने आदिवासी समाजाच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लागेल, अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचे अभिनंदन केलं.
यानंतर सभागृहाच्या वतीने दोघांचंही अभिनंदन करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा विधेयक, महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक, आणि मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं.
hadapsarinfomedia@gmail.com