The relief work after the Morbi bridge accident in Gujarat is in the final stage
गुजरातमधे मोरबी पूल दुर्घटनेनंतरचं मदतकार्य अंतिम टप्प्यात
दुर्घटनेत १३२ जणांचा मृत्यू झाला असून २ जण अद्याप बेपत्ता
मोरबी : गुजरातमध्ये मोरबी इथल्या मच्छू नदीवरचा झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचाव कार्य आता अंतिम टप्प्यात आलं आहे. या दुर्घटनेत १३२ जणांचा मृत्यू झाला असून २ जण अद्याप बेपत्ता असल्याचं गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितलं.
एनडीआरएफ, एसडीआरएफ, हवाई दल, लष्कर आणि नौदलासह विविध सुरक्षा यंत्रणांनी काल रात्रीपासून सुरू केलेले बचावकार्य लवकरच संपेल, असेही ते पुढे म्हणाले.
याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. या दुर्घटनेमागच्या कारणांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं पाच सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी जिल्हाप्रशासनाशी चर्चा केली आणि मदत कार्याचा आढावा घेतला.
हा पूल नूतनीकरणानंतर पाचच दिवसांपूर्वी नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. मोरबी केबल पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र खेद प्रकट केला असून प्रधानमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
या दुर्घटनेच्या बचाव कार्यावर बारकाईनं लक्ष देण्याचे आणि बाधित व्यक्तींना शक्य ती सर्व मदत देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मदत आणि बचाव कार्यात कोणतीही हलगर्जीपणा केला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com