More than 4,000 new corona patients registered in the state
राज्यात कोरोनाच्या ४ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात कोविड १९ च्या रुग्णांची दैनंदिन संख्या वाढत असून, काल ४ हजार २४ नव्या रुग्णांची नोंद झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १९ हजार २६१ वर पोचली आहे. त्यापैकी १२ हजार ३४१ रुग्ण मुंबईतले आहेत.
काल ३ हजार २८ रुग्ण बरे झाले, तर २ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यातल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए-5 या नव्या प्रकारच्या विषाणूची बाधा झालेले आणखी चार रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. हे सर्व रुग्ण २६ मे ते ९ जून या कालावधीतले असून, सर्वांची प्रकृती स्थीर असल्याचं आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
१२ ते १४ वयोगटातल्या ७५ टक्क्यापेक्षा जास्त मुला-मुलींना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा.
देशातल्या १२ ते १४ वयोगटातल्या ७५ टक्क्यांहून अधिक मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे. देशातल्या सर्व युवकांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलंय.
आतापर्यंत देशातल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीच्या १९५ कोटी ६४ लाखांहून अधिक मात्रा मिळाल्या आहे. त्यातल्या १०१ कोटी ४२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी पहिली आणि ९० कोटी ३२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. ३ कोटी ८९ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे.
आज दिवसभरात ९ लाख ८० हजारांहून अधिक व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. देशातल्या १२ ते १४ वयोगटातल्या ५ कोटी ५८ लाख लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. १५ ते १७ वयोगटातल्या पावणे ११ कोटी लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली आहे.
राज्यातल्या १६ कोटी ८१ लाख लाभार्थ्यांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेतली आहे. त्यातल्या ९ कोटी ६ लाख लाभार्थ्यांनी पहिली तर ७ कोटी ४१ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे. राज्यातल्या ३३ लाख ७ हजारांहून अधिक व्यक्तींनी वर्धक मात्रा घेतली आहे.
हडपसर न्युज ब्युरो