This year, more than 65 per cent of the rainfall returned to the entire country
संपूर्ण देशात यंदा ६५ टक्के जास्त, तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपट परतीचा पाऊस
नवी दिल्ली : नैऋत्य मोसमी पावसाच्या मुक्कामात यंदा संपूर्ण देशात ६५ टक्क्याहून जास्त परतीचा पाऊस पडला. महाराष्ट्रात पावसाळ्याचा अधिकृत कालावधी संपल्यानंतर सरासरीपेक्षा दुप्पट म्हणजे १०२ टक्के परतीचा पाऊस पडला. दरवर्षी राज्यात साधारण ६५ पूर्णांक ४ दशांश मिलीमीटर परतीचा पाऊस पडतो; यंदा राज्यात १३२ पूर्णांक ३ दशांश मिलीमीटर परतीच्या पावसाची नोंद झाली.
सर्वसाधारण वेळेपेक्षा आठ दिवस उशिरा आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन दिवस आधी यंदा मोसमी वारे देशातून परत फिरले. देशातील सर्वाधिक परतीचा पाऊस दिल्लीमध्ये झाला असून, सरासरीच्या तुलनेत तो चौपट ठरला.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या हंगामाच्या कालावधीत राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेत २४ टक्के अधिक पावसाची नोंद जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होऊन राज्यातील सर्वच जिल्ह्यांनी पावसाची सरासरी पूर्ण केली.
हंगामाचा कालावधी संपल्यानंतर मात्र ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात राज्यातच नव्हे, तर देशाच्या विविध भागांत धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.
जिल्हानिहाय परतीचा पाऊस विचारात घेतला तर यंदा एकाच जिल्ह्यात म्हणजे चंद्रपूरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. गडचिरोली, नांदेड आणि रत्नागिरीमध्ये सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस झाला. राज्याच्या उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा बऱ्याच जास्त पावसाची नोंद झाली; अनेक जिल्ह्यांमध्ये तर तो सरासरीच्या दुपटीहूनही अधिक झाला आहे.
राज्यात सर्वाधिक पाऊस २३० मिलीमीटर पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात झाला. पण सरासरीच्या दृष्टीने विचार केला तर ठाणे जिल्ह्यात तिथल्या सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे १८६ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com