MP Sanjay Raut granted bail after 100 days
खासदार संजय राऊत यांना १०० दिवसांनी जामीन मंजूर
मुंबई : खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज आज न्यायालयानं मंजूर केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ३१ जुलै रोजी ईडीनं राऊत यांना अटक केली होती. तब्बल शंभर दिवसांनंतर संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर झाला असून त्यांच्यासह त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
संजय राऊत बराच काळ तुरुंगात होते. पत्रा चाळ जमीन घोटाळाप्रकरणी मुंबईतील पीएमएलए कोर्टाने शिवसेनेच्या खासदाराला जामीन मंजूर केला आहे. आता राऊत लवकरच तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, आतापर्यंत पीएमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नव्हता. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. अखेर आज कोर्टाने त्यांना आज जामीन मंजूर केला.
संजय राऊत यांच्या सोबतच त्यांचा सहकारी प्रवीण राऊत यालाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑगस्टमध्ये अटक केली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून गेल्या अडीच वर्षांमध्ये संजय राऊत यांनी वेळोवेळी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली होती. शिवसेनेचा अजेंडा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम संजय राऊत हे चोखपणे पार पाडत होते.
संजय राऊत भाजपविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची भूमिका लोकांना पटवून देण्याचे काम करत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत काही काळातच तुरुंगात गेल्याने ठाकरे गटाकडे प्रभावीपणे पक्षाची बाजू मांडणार प्रभावी वक्ता उरला नव्हता. सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊत यांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळताच, शिवसैनिकांनी कोर्टाचे आभार मानले आहे.
आज खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं होतं की मै झुकुंगा नहीं. मी काहीही झालं तरी झुकणार नाही असं म्हटलं होतं. ते शेवटपर्यंत लढले. आज त्यांच्या भूमिकेचा विजय झाला आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आहे असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे
सुषमा अंधारे यांनी टायगर इज बॅक असं म्हणत ट्विट केलं आहे.सुषमा अंधारे या शिवसेनेतल्या फायर ब्रांड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आता त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच सूचक आहे।
पत्राचाळ प्रकरण
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.
संजय राऊत आणि त्यांचे बंधू प्रविण राऊत हेच पत्राचाळ प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे ईडीनं लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा युक्तिवाद संजय राऊतांच्या वतीनं करण्यात आला होता.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “खासदार संजय राऊत यांना १०० दिवसांनी जामीन मंजूर”